सुरत ः वृत्तसंस्था
येथील सरथाना भागातील तक्षशिला कॉम्प्लेक्स इमारतीला लागलेल्या भीषण आगीत 19 जणांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक वृत्त आहे. यातील बहुतांश विद्यार्थी आहेत. घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अग्निशमन दलाच्या 19 गाड्या घटनास्थळी पोहचल्या असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या इमारतीत एक डान्स क्लास आणि फॅशन इन्स्टिट्यूट आहे. इमारतीच्या दुसर्या मजल्यावर आग लागली. या आगीत 35 जण अडकल्याची माहिती आहे. अनेकांनी जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या दुसर्या मजल्यावरून उड्या मारल्या. इमारतीतून उड्या मारणार्यांमध्ये बहुतांश विद्यार्थीही होते. तक्षशिला एक कमर्शिअल कॉम्प्लेक्स आहे. यात अनेक दुकाने आणि कोचिंग सेंटर्स आहेत. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही, मात्र एसी डक्ट्स आणि कॉम्प्रेसरमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी यांनी आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत, तसेच मृतांच्या नातेवाइकांना चार लाख रुपयांची आर्थिक मदतही जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या आगीच्या घटनेबाबत ट्विट करीत शोक व्यक्त केला आहे.