पनवेल : खांदेश्वर पोलीस ठाण्याकडील प्रतिबंधक केसमध्ये एसीपी कार्यालयात सर्व मॅनेज करून जामीन करून देतो, असे सांगून फिर्यादीकडून तीन हजार रुपये उकळून जामीन करून न देता खोटी माहिती देऊन फसवणूक करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने परिहार चौक, वाकड येथून ताब्यात घेतले आहे. फिर्यादी भोला राजभर (33 रा. आसूडगाव) याच्यावर खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यासंदर्भात तो पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या समोरील रस्त्यावर आला असता आरोपीने त्याच्याशी ओळख वाढवून व स्वतःचे नाव गणेश मोरे असे सांगून त्याने गंडा घातला.
हत्येचा प्रयत्न करणार्याला कारावास
पनवेल : कामोठ्यातील त्रिमूर्ती चौकातून दुचाकीवरून जाणार्या मितेश गोंधळी यांना पायी चालत जाणार्या एका मुलीने शिवीगाळ केल्यामुळे त्यांनी दुचाकी वळवून मुलीला जाब विचारला. या वेळी येथे हजर असलेल्या अभिजित राऊत या व्यक्तीने मितेश गोंधळी यांच्यावर चाकूने हल्ला केला. 10 सप्टेंबर 2012 रोजी कामोठे शहरात त्रिमूर्ती चौकात घडलेल्या या घटनेचा निकाल लागला असून किरकोळ कारणावरून जीवघेणा हल्ला करणार्या अभिजित राऊत याला पाच वर्षांचा कारावास आणि एक हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. कळंबोली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप गिरधर यांनी केला होता.
लायन्स क्लब अध्यक्षपदी शोभा गिल्डा
पनवेल ः लायन्स क्लब ऑफ पनवेलच्या पदग्रहण समारंभ माजी प्रांतपाल लायन प्रदीप कपडिया व विशेष पाहुणे लिओ मल्टीपल डिस्ट्रीक्ट प्रेसिडंट लिओ चाहत मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात नवनिर्वाचित अध्यक्षपदी शोभा अशोक गिल्डा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळत्या अध्यक्षा लायन मीना संजय पोतदार यांच्याकडून त्यांनी सूत्रे स्वीकारली. या वेळी सचिवपदी लायन ज्योती नागेश देशमाने, खजिनदारपदी लायन राजेंद्र जेसवानी यांनी पदभार स्वीकारला. तसेच लिओ क्लबचा पदभार लिओ आदित्य शेळके यांनी स्वीकारला. लिओ चेअरमन लायन संजय गोडसे यांनी पदभार स्वीकारला. प्रमुख पाहुण्यांनी क्लबचे कौतुक करताना लायन्स क्लब पनवेलने गतवर्षी एकूण 943 कॅटरॅन्ट ऑपरेशन विनामूल्य केले. या कार्याची विशेष दखल घेण्यात आली. याकरिता डिस्ट्रीक्टने ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला. क्लबला तसेच पुढील कार्यास शुभेच्छा मान्यवरांनी दिल्या.