Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर कणखर नेतृत्व -मंत्री शिवेंद्रराजे भोसले

चिपळे येथील नव्या पुलाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासारखे कणखर नेतृत्व लाभल्यामुळे या तालुका आणि जिल्ह्याचा विकास रोखणे अशक्य आहे, असे गौरवोद्गार राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी काढले. ते पनवेलमधील चिपळे येथील नव्या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते.
कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून उभारण्यात आलेल्या चिपळे येथील पुलाचे लोकार्पण राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि. 19) झाले. या पुलामुळे आजूबाजूच्या गावांची कनेक्टिव्हीटी सुरळीत झाली आहे. पनवेल तालुका आणि जिल्हा हे आज झपाट्याने प्रगतिपथावर वाटचाल करत आहेत. या प्रगतीमागे लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांचे खंबीर नेतृत्व, दूरदृष्टी आणि जनविकासाभिमुख दृष्टिकोन असल्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी या वेळी बोलताना अधोरेखित केले.
या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रल्हाद केणी, टीआयपीएलचे संचालक अमोघ ठाकूर, भाजप तालुका पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, एकनाथ देशेकर, माजी सरपंच रमेश पाटील, शिवाजी दुर्गे, वासुदेव गवते, विभागीय अध्यक्ष सुनील पाटील, शिवकर ग्रामपंचायतीचे सरपंच आनंद ढवळे, डॉ. रोशन पाटील, विश्वजित पाटील, मयूर कदम, गौरव कांडपिळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.
सन 1975 साली बांधण्यात आलेल्या नेरे-माळडुंगे रस्त्यावरील चिपळे पुलावरून मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते. या पुलाचे आयुर्मान जवळपास 50 वर्षे होते, मात्र 2005मध्ये आलेल्या पुराचा मोठा तडाखा या पुलाला बसला आणि पुलाचे नुकसान झाले होते. पूल खचण्याची भीती निर्माण झाली होती. त्यामुळे या पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांडून होत होती. भविष्यात मोठा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता व्यक्त होत होती. पूल धोकादायक झाल्याने तात्पुरती डागडुजी उपयोगाची नसल्याने यावर योग्य पर्याय म्हणून त्या ठिकाणी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यातून नवीन पूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नाने अर्थसंकल्पीय निधीतून 10 कोटी रुपये खर्च करून या पुलाची उभारणी झाली.
या पुलाचा वापर नेरे, चिपळे, वाजे, गाढेश्वर, धोदाणी, माळडुंगे या परिसरात जाण्यासाठी केला जातो. हा पूल जवळपास 66 मीटर लांब, 12 मीटर रुंद आहे. वाहतुकीच्या दृष्टिकोनातून या पुलाच्या सुविधेमुळे प्रवासी, वाहनचालक आणि ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून या विकासकामासाठी सतत प्रयत्न केल्याबद्दल नागरिकांकडून आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले जात आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर ‌‘रयत‌’चे ऋण फेडणारे आधुनिक एकलव्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

लोकनेते रामशेठ ठाकूर म्हणजे विकासाचे कणखर नेतृत्व ः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पनवेल ः रामप्रहर …

Leave a Reply