Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत -संजय आवटे

जीवनगौरव पुरस्काराने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त
आदिवासी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी आपल्या भरीव मदतीतून शिक्षणाला प्राधान्य देणारे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे शैक्षणिक कार्य आदर्शवत असल्याचे गौरवोद्गार दैनिक लोकमतचे (पुणे) संपादक, विचारवंत संजय आवटे यांनी पनवेल येथील सोहळ्यात व्यक्त केले.
गणेश कोळी संपादित पनवेल टाइम्सच्या वर्धापन दिनानिमित्त सन्मान कर्तृत्वाचा… सन्मान पनवेलकरांचा या शीर्षकांतर्गत पनवेल टाइम्स सन्मान पुरस्कार सोहळा शनिवारी (दि. 27) पनवेलच्या मार्केटयार्ड येथील श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या सभागृहात झाला. त्या वेळी आवटे बोलत होते.
या सोहळ्यास ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे, सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे, पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, कोकण मराठी साहित्य परिषदेचे रायगड जिल्हा अध्यक्ष संजय गुंजाळ आदी उपस्थित होते.
या वेळी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे आणि ‘लोकमत’चे संपादक संजय आवटे यांच्या हस्ते लोकनेते रामशेठ ठाकूर यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर पनवेलचे नाव उंचवणार्‍या व्यक्ती आणि संस्थांना पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
या वेळी संजय आवटे म्हणाले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे दातृत्व आहेच, शिवाय ते दातृत्व कुठल्या ठिकाणी करावे याचे भानही आहे. जर शाळा चांगल्या नसतील तर विद्यार्थ्यांचे भवितव्य घडणार नाही, परंतु रामशेठ ठाकूर यांच्यामुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळत असून असा नेता आम्हाला हवा आहे. त्यांचा हा शैक्षणिक आदर्श इतरांनी घेतला तर महाराष्ट्रात शिक्षणाबाबत चिंता असणार नाही.
वृत्तपत्र चालवणे ही मोठी कठीण गोष्ट आहे. आज पत्रकारिता बदलत चालली असून मोबाईलने क्रांती केली आहे. त्यामुळे माध्यमे हातात आली असली तरी विचार करायला शिकवत नाही. सर्वसामान्य माणूस हा अत्यंत महत्त्वाचा आहे.हा देश सर्वसामान्यांचा, तुमचा आणि माझा आहे. त्यामुळे सर्वसामान्य केंद्रबिंदू असला पाहिजे. त्यातूनच आपला विकास होईल, असेही आवटे यांनी सांगितले.
ज्येष्ठ संपादक मधुकर भावे यांनीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या कार्याचा आढावा घेत कौतुक केले. पुढे बोलताना त्यांनी वाचणार्‍यांची संस्कृती आज संपत चालली आहे, पण पत्रकार कधी स्वस्त बसत नाही. जे तुम्हाला लिहिता येते ते लिहीत रहा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
गौरवमूर्ती लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या भाषणात म्हटले की, समाजात चांगले काम करणार्‍या व्यक्ती, संस्थांचा पनवेल टाइम्स सन्मान पुरस्काराने सन्मान करण्यात आला ही कौतुकाची गोष्ट आहे. वृत्तपत्रे ही सर्वसामान्यांचा आवाज उठवणारी असावीत. आवश्यक तेथे आक्रमक बातम्या प्रसिद्ध करून सर्वसामान्यांना वृत्तपत्रांनी न्याय दिला पाहिजे. प्रशासनाचे लक्ष वेधले पाहिजे. पत्रकारितेबरोबरच सामाजिक उपक्रमही राबवावेत.
सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे हिने मनोगत व्यक्त केले. सुप्रसिद्ध कवी अरुण म्हात्रे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या जीवन गौरव पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पनवेल टाइमचे संपादक गणेश कोळी यांनी केले.
वर्धापन दिनानिमित्ताने विकासाचं आंतरराष्ट्रीय शहर-पनवेल… या विषयावरील निबंध स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख पारितोषिके देण्यात आली. त्याचप्रमाणे फॅशन शो संचालक देवदत्त घरत यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल सौंदर्यवती (रन वे) स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धकांनी प्रतिसाद दिला. त्यांच्या कलेला मान्यवरांचे हस्ते सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दर्शना माळी यांनी केले.

Check Also

नांदगाव येथे भाजप महायुतीचा जोरदार प्रचार

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात …

Leave a Reply