Breaking News

वसई जूचंद्र येथील विद्यालयासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून 50 लाखांची देणगी

वसई : प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व एस पी जुनिअर कॉलेज, जुचंद्र तालुका वसई येथे पद्मभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 138वा जयंती सोहळा आयोजित करण्यात आला होता. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यालयाला नवीन इमारत बांधण्यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी 50 लाखांची देणगी जाहीर केली.
या सोहळ्यास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत दळवी, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रायगड विभागाचे चेअरमन बाळाराम पाटील, गव्हाण विद्यालयाच्या मुख्याध्यापिका व मॅनेजिंग कौन्सिल सदस्य ज्योत्स्ना ठाकूर, जनरल बॉडी सदस्य विनय पाटील, रायगड विभागाचे विभागीय अधिकारी मोहन कोंगेरे तसेच विद्यालयाचे प्राचार्य तथा सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप आदी उपस्थित होते.
या वेळी रांगोळी प्रदर्शन व ’अण्णांचे स्वप्न…वाटचाल पूर्णत्वाकडे’ या उपक्रमांतर्गत अण्णांचे भावविश्व व रयतेची गगनभरारी या देखाव्यांचे उद्घाटन चंद्रकांत दळवी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी बनविलेल्या रोबोट्सचे खूप कौतुक केले. यानंतर डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य व सहाय्यक विभागीय अधिकारी विलासराव जगताप यांनी केले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यालय व ग्रामस्थांमार्फत देण्यात येणारा कर्मवीर पुरस्कार 2025 माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांना देण्यात आला तर आदर्श शिक्षक कर्मवीर पुरस्कार 2025 हा मानसी साळुंखे यांना देण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष व रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य विलासराव जगताप सर तसेच विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले. रयत शिक्षण संस्था भविष्यामध्ये तांत्रिक दृष्ट्या स्वतंत्र असेल, असे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी हाती घेतलेल्या नवनवीन उपक्रमांची माहिती दिली.
रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे, वटवृक्षाचा विशालतेचा मोह नभाला पडतो आहे या पंक्तीप्रमाणे रयत शिक्षण संस्थेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सारख्या उपक्रमामुळे आधुनिक युगातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी सज्ज होत आहेत आणि यामुळे रयत शिक्षण संस्थेचा मोह पूर्ण महाराष्ट्राला पडेल, अशी सदिच्छा चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक संजय म्हात्रे यांनी मानले तर सूत्रसंचालन जान्हवी भोसले यांनी केले.

Check Also

भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी नवा अध्याय -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पनवेल ः रामप्रहर वृत्तसहकारी तत्त्वावरील भारत टॅक्सी सेवा प्रवासी आणि चालकांसाठी एक नवा अध्याय असून …

Leave a Reply