Breaking News

राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा रौप्य महोत्सव

राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला एक लाख रुपये, तर रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास 40 हजार रुपये

पनवेल : रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शैक्षणिक, सामाजिक, कला. क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने 25व्या अर्थात रौप्यमहोत्सव राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची पूर्वापार चालत आलेली एक सांस्कतिक परंपरा आहे. ही परंपरा अखंडपणे चालू राहावी व त्यातून दर्जेदार दिवाळी अंकांची निमिर्ती व्हावी, यासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्‍या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने गेल्या 24 वर्षापासून महाराष्ट्रातील सर्वात मोठया दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून यंदा ही 25वी स्पर्धा आहे.
भरघोस रक्कमेची पारितोषिक असलेल्या या स्पर्धेच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमाकांस एक लाख रुपये, व्दितीय क्रमाकांस 50 हजार तर ततीय क्रमाकांस 30 हजार रूपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेतील लक्षवेधी उत्कृष्ट अंकाला 15 हजार रुपये, सर्वोत्कृष्ट विशेषांकाला 15 हजार रुपये, उत्कष्ट कथेसाठी सात हजार रूपये, उत्कष्ट कविता, उत्कष्ट व्यंगचित्र, उत्कृष्ठ लेख, लक्षवेधी परिसंवाद, लक्षवेधी मुलाखत व उत्कृष्ठ मुखपृष्ठ यांना प्रत्येकी पाच हजार रुपये, त्याचबरोबर बालसाहित्याच्या सवोत्कष्ट अंकास 7500 रूपये, सर्वोत्कृष्ट डिजिटल अंकाला 7500 रुपये तसेच रायगड जिल्हयातून प्रकाशित होणार्‍या दिवाळी अंकांसाठी खास पारितोषिके देण्यात येणार असून यामध्ये प्रथम क्रमांकास 40 हजार रूपये, व्दितीय क्रमांकास 20 हजार रूपये आणि ततीय क्रमाकांस 10 हजार रूपये, दोन उत्तेजनार्थ प्रत्येकी 05 हजार रुपये, उत्कृष्ठ कथा, कविता आणि व्यंगचित्र यांना प्रयेकी पाच हजार रुपये आणि सर्व पुरस्कारप्राप्त अंकांना सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे.
यंदाही या स्पर्धेत स्पर्धकांनी मोठया संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे.
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी दिवाळी अंकाच्या दोन प्रती 100 रूपये प्रवेश फीसह 15 डिसेंबर 2025 पर्यत पाठवाव्यात. दिवाळी अंक पाठविण्यासाठी व अधिक माहितीसाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ, प्लॉट क्रमांक 475, मार्केट यार्ड, पनवेल, जि. रायगड. अनिल कोळी (9769409161) यांच्याशी संपर्क साधावा, असेही आवाहन आयोजकांनी केले आहे.

दिवाळी अंकांना प्रोत्साहन
राज्यातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठित म्हणून ओळखली जाणारी हि दिवाळी अंक स्पर्धा यंदा रौप्यमहोत्सवी वर्षात प्रवेश करत आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली 25 वर्षे ही स्पर्धा सातत्याने आयोजित होत असून, राज्यभरातील विविध दिवाळी अंकांना प्रोत्साहन देत आहे. राज्यातील दिवाळी अंकांच्या समृद्ध परंपरेला आणि सर्जनशीलतेला बळ देण्याच्या हेतूने सुरू झालेली ही स्पर्धा आज संपादक,
लेखक, कलाकार आणि वाचक यांच्यातील सृजनशीलतेचा दुवा आणि संवादाचे व्यासपीठ म्हणून ओळखली जाते.

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply