Breaking News

‘दिबां’च्या विमानतळ नामकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक

सीएम लवकरच प्रेस स्टेटमेंट देणार -आमदार प्रशांत ठाकूर

नागपूर ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या विमान उड्डाणापूर्वी लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव दिले जावे यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राज्याचे वनेमंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी (दि. 10) नागपूर येथे भेट घेत चर्चा केली. लोकनेते दि.बा. पाटील विमानतळ नामकरणासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपण सकारात्मक असल्याचे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केल्याचे सांगून याबाबत मुख्यमंत्री महोदय लवकरच प्रेस स्टेटमेंट देणार असल्याची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली, त्या वेळी मंत्री आशिष शेलार, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार किसन कथोरे, आमदार रविशेठ पाटील, आमदार सुलभा गायकवाड, माजी खासदार संजीव नाईक, लोकनेते दि.बा. पाटील यांचे पुत्र अतुल पाटील, विनोद म्हात्रे, राजेश गायकर व समितीचे सदस्य उपस्थित होते.
यानंतर आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिष्टमंडळाच्या वतीने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येत्या 25 तारखेला खुले होणार आहे. ते खुले होण्याच्या आधी राज्य सरकारने या विमानतळाला घोषित केलेले लोकनेते दि.बा. पाटील हे नामकरण किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेतील ‘दिबां’च्या नावाचा नामविस्तार व्हावे या दृष्टिकोनातून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्री गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने भेट घेतली. नवी मुंबई विमानतळावर पहिले उड्डाण होण्याआधी या विमानतळाचे ‘दिबा’साहेबांच्या नावाने नामकरण झाले पाहिजे यासाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये मागणी व अस्वस्था आहे आणि ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या आंदोलनांची घोषणा होत आहे. अशावेळी या विमानतळाला ‘दिबा’साहेबांचे नाव पहिले उड्डाण होण्यापूर्वी लागले पाहिजे ही प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांची तळमळ आहे.
लोकनेते दि.बा. पाटील यांचे विमानतळाला लागण्यासाठी झालेल्या अनेक मोर्चे, आंदोलन संघर्षात आम्हा सर्वांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याचे सांगून सगळ्यात जास्त तळमळ आमच्यात, प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमध्ये असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले. त्यामुळेच आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आम्ही सर्वांनी भेट घेत उड्डाणापूर्वी ‘दिबा’साहेबांच्या नावाने विमानतळाचे नामकरण झाले पाहिजे अशी पुनर्मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी नेमके त्याच्या आधी होईल का सांगता येणार नाही, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वस्त केले आहे. त्यामुळे विमानतळाला दि.बा. पाटीलसाहेबांचे नाव लागणारच, असे स्पष्ट केले. या यासंदर्भात त्यांनी प्रेस स्टेटमेंट द्यावे अशी आमच्या शिष्टमंडळाने विनंती केली. त्यावर त्यांनी या संदर्भामध्ये लवकरच यथायोग्य प्रेस स्टेटमेंट देणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री महोदय आपले प्रेस स्टेटमेंट देऊन प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांमधील संदिग्धता मिटवतील अशी अपेक्षा आहे. प्रत्यक्ष ज्या वेळेला ‘दिबा’साहेबांच्या नावाचे नामकरण होईल त्या वेळेला विजयी उत्सव आम्ही साजरा करू, असेही या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
विरोधकांच्या वक्तव्यावर विचारलेल्या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलताना आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की, खरंतर ज्या प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आंदोलनात भाग घेतला त्यांना या संदर्भात जाब विचारण्याचा अधिकार आहे, पण ज्यांनी दि.बा. पाटीलसाहेबांचे नावही घेतले नाही, कारण त्यांना त्या वेळी ‘दिबा’साहेबांच्या नावाची काविळ होती आणि राजकारणात तर फार आधीपासून असताना यापूर्वी झालेल्या आंदोलनात ते कुठेही दिसले नाहीत, उलट हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव दिले जावे याच्यापुढे ते शब्दही काढत नव्हते अशांना तर आम्हाला कुठलाही प्रश्न विचारायचा अधिकार नाही, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी रोखठोकपणे स्पष्ट केले.
ज्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शब्द आहे सांगतात आणि तसे आश्वस्त करतात, तो आमच्यासाठी अंतिम आहे. पंतप्रधानांना या संदर्भात भेटणार का या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. त्यांच्या नेतृत्वाखाली जे काही प्रयत्न करायचे आहेत ते सर्व प्रयत्न करू, असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी शिष्टमंडळाच्या वतीने नमूद केले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply