आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले मार्गदर्शन
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेलजवळील सुकापूर येथे एकता मित्र मंडळ, तिरंगा मित्र मंडळ आणि माऊली प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (दि. 17) आयोजित करण्यात आलेला लाडकी बहीण मेळावा अत्यंत भव्य दिव्य स्वरूपात पार पडला. या मेळाव्याला कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थिती दर्शवून महिला भगिनींना मार्गदर्शन करताना केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध लोककल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेतला.
या मेळाव्याला भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, पाली देवद ग्रामपंचायतीचे उपसरपंच दिवेश भगत, सदस्य महेश पाटील, उदय म्हस्कर, महेश केणी, माजी उपसरपंच आलुराम केणी, राहुल पोपेटा, नेताजी पाटील, हनुमंत खुटले, योगेश पाटील, प्रशांत गांगर्डे, शशिकांत पाटील, मनोहर भोपी, प्रमोद सावंत, प्रवीण सावंत, रूपेश पाटील, प्रितेश मोरे, सरपंच ज्योती केणी, माजी सरपंच योगिता पाटील, उपसरपंच मेनका खुटले, माजी ग्रामपंचायत सदस्य भारती भगत, ग्रामपंचायत सदस्य पुष्पा म्हस्कर, प्राची जाधव, वैशाली सावंत, उषा पाटील, शामली भगत, निकिता पाटील, रश्मी पाटील, भारती पोपेटा, शिल्पा केणी, मिनाक्षी केणी, पूजा सावंत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी, सन 2014पासून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महिला सक्षमीकरणासाठी उचललेल्या क्रांतिकारी पावलांचा उल्लेख करताना जनधन खाते, आधार आणि मोबाईल या त्रिसूत्रीमुळे सरकारी योजनांचा लाभ आता कोणत्याही मध्यस्थाशिवाय थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होत असल्याचे आवर्जून सांगितले.
राज्यातील महायुती सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांना दरमहा मिळणार्या 1500 रुपयांच्या आर्थिक मदतीने अनेक भगिनींनी स्वतःचे छोटे व्यवसाय सुरू करून स्वावलंबनाकडे पाऊल टाकले आहे, असे गौरवोद्गार आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी काढले. भाजप अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांच्यासह सुकापूरमधील भाजपच्या लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळेच या भागातील रस्ते, पाणी, आरोग्य आणि स्वच्छतेचे अनेक प्रश्न मार्गी लागले असून परिसरात सातत्याने होणारी भूमिपूजने आणि उद्घाटने हेच येथील खर्या विकासाचे पुरावे आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 78 जागांपैकी 59 जागांवर महायुतीने निर्विवाद विजय मिळवला असून त्यापैकी 55 जागा एकट्या भाजपने जिंकल्या आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीला साध्या 20 जागांचा टप्पाही गाठता आलेला नाही. हा सर्वसामान्य जनतेचा आणि महिलाशक्तीचा आशीर्वाद असल्याचे सांगत येणार्या 5 तारखेला होणार्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीतही भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी जनतेने असाच पाठिंबा द्यावा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी या वेळी केले.
या मेळाव्याचे विशेष आकर्षण महिलांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम व खेळ पैठणीचा ठरला, ज्याला सुकापूर परिसरातील महिलांनी प्रचंड गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
RamPrahar – The Panvel Daily Paper