Breaking News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वहाळ येथे शाळा प्रवेशोत्सव उत्साहात

आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त
रायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये सोमवारी (दि.१५) विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि औक्षण करत नवोदित विद्यार्थ्यांचा हा प्रवेशोत्सव अत्यंत दिमाखात साजरा झाला. या प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण पनवेल तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या पीएमश्री शाळा वहाळ येथे पहायला मिळाले, जिथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या शाळेतील अत्याधुनिक आयडियल सेंटर डिजिटल लॅबचे उद्घाटन करण्यात आले.
वहाळ शाळेत आयोजित विशेष कार्यक्रमास माजी खासदार रामशेठ ठाकूर, भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे, दुग्ध व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील, राजिप मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते, राजिप सदस्य कमला देशेकर, अनन्या गाताडे, प्राची जाधव, हर्षदा घरत, निकिता खारकर, शिक्षणाधिकारी महारूद्र नाळे व ललिता दहितुले यांच्यासह इतर मान्यवर, पदाधिकारी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
डिजिटल लॅब उद्घाटन सोहळ्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी या अत्याधुनिक प्रयोगशाळेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि तिची डिजिटल कार्यपद्धती सविस्तरपणे जाणून घेतली. या डिजिटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना आता दृकश्राव्य (ऑडिओ-व्हिज्युअल) पद्धतीने आधुनिक शिक्षण मिळणार असून यामुळे कठीण मानले जाणारे विषयही अत्यंत सोपे, रंजक आणि मनोरंजक होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी डिजिटल शिक्षणाचे महत्त्व विशद करताना व्यक्त केला.
सर्व वर्गांचा अभ्यासक्रम या डिजिटल प्रणालीमध्ये आधीपासूनच उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे शिक्षकांना अध्यापन करणे अधिक सोपे, परिणामकारक आणि वेळेची बचत करणारे ठरणार आहे. या प्रणालीत विद्यार्थ्यांची ऑनलाईन परीक्षा घेण्याची विशेष सुविधा असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये सुरुवातीपासूनच तांत्रिक आणि डिजिटल कौशल्ये विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. शिक्षण विभागाच्या माध्यमातून संपूर्ण राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारच्या अत्याधुनिक डिजिटल लॅब उभारण्याचे काम अत्यंत वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.
या संपूर्ण सोहळ्यातील सर्वात रंजक आणि संस्मरणीय टप्पा म्हणजे मुख्यमंत्र्यांनी पहिलीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या चिमुरड्यांसह इतर विद्यार्थ्यांशी साधलेला थेट संवाद ठरला. त्यांनी सर्वप्रथम इयत्ता चौथी ‘अ’च्या विद्यार्थ्यांशी आणि त्यानंतर इयत्ता दुसरी ‘अ’च्या विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या ज्ञानाची, वाचनाची आणि एकूणच शैक्षणिक प्रगतीची अत्यंत उत्सुकतेने माहिती घेतली. वहाळ येथील शाळेतील विद्यार्थ्यांची शिस्त, अभ्यासातील प्रगती आणि ज्ञानाची प्रगल्भ पातळी पाहून मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले आणि शिक्षकांच्या अविरत परिश्रमांचे कौतुक केले.
जिल्हा परिषद शाळांमधील गुणात्मक बदलांमुळे आता अनेक पालकांचा सरकारी शाळांवरील विश्वास पुन्हा दृढ होत आहे, ही अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या भाषणात मूल्यधारित शिक्षणावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान देणे पुरेसे नसून त्यांच्यात संवैधानिक मूल्ये, नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्ये, स्वच्छता, पर्यावरण संवर्धन तसेच सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण करणे तितकेच आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. अशा व्यापक उपक्रमांमधून उद्याचा सुजाण, सुसंस्कृत आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे काम राज्य शासन अत्यंत प्रामाणिकपणे करत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. त्याचप्रमाणे गावकरी, पालक आणि शाळा व्यवस्थापन समित्यांचा सक्रिय सहभाग हा शाळांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मुख्य कणा असल्याचे सांगत ज्या शाळांमध्ये पालकांचा थेट सहभाग असतो त्या शाळा राज्यात आदर्श ठरतात, त्यामुळे पालकांनी शिक्षकांशी सातत्याने संवाद ठेवावा, असे आवाहनही त्यांनी केले.
कार्यक्रमात इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून त्यांचे शाळेत स्वागत करण्यात आले तसेच नवागत विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प देऊन स्वागत करून पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
चौथीच्या विद्यार्थिनीने घेतली मुख्यमंत्र्यांची मुलाखत
वहाळ शाळेत आयोजित प्रवेशोत्सव कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत एक प्रेरणादायी संवाद घडला. शाळेतील इयत्ता चौथीच्या विद्यार्थिनीने मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेत शिक्षण, सामाजिक कार्य आणि डिजिटल युगातील बदलांबाबत प्रश्न विचारले. विद्यार्थिनीच्या आत्मविश्वासपूर्ण प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी मनमोकळेपणाने उत्तरे देत उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आपल्या सार्वजनिक जीवनाच्या प्रवासाबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, विद्यार्थी म्हणून भारतीय विद्यार्थी परिषदेत काम करताना विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत-सोडवतच माझा सामाजिक आणि राजकीय प्रवास सुरू झाला. समाजात सकारात्मक बदल घडवून आणताना संघर्ष अपरिहार्य असतो, मात्र चांगल्या कार्यासाठी सातत्याने प्रयत्न केल्यास यश निश्चित मिळते, असे त्यांनी नमूद केले.
डिजिटल युगातील शिक्षणाविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, डिजिटल शिक्षण हे काळाची गरज असून भविष्यातील शिक्षण व्यवस्थेचा महत्त्वाचा आधार आहे.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांनी त्यांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयतेसाठी सर्वस्व अर्पण केले

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे गौरवोद्गार सातारा : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्राच्या सामाजिक, शैक्षणिक …

Leave a Reply