नाना पटोले यांनी दावा केलेल्या मोदी नावाच्या कथित गावगुंडाला नागपूरमध्ये एका वकिलाने प्रसारमाध्यमांसमोर उभे केले खरे, परंतु माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तरे देताना या कथित गुंडाची बोबडी वळली. पटोले यांनी उल्लेख केलेला मोदी आपणच आहोत असा दावा त्याने केला असला तरी, मोदींसंदर्भात पटोलेंनी केलेली दर्पोक्ती अंगलट येऊ लागल्याने उगाचच कुणाला तरी गावगुंड मोदी म्हणून उभे करण्यात आल्याची प्रतिक्रियाच उमटते आहे.
काँग्रेसचे पक्षाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत केलेले आक्षेपार्ह विधान आणि त्यानंतर त्यासंदर्भात चाललेली त्यांची केविलवाणी सारवासारव हे सारेच काँग्रेस पक्षाकरिता आत्यंतिक दुर्दैवी आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात भूमिका बजावणारा आणि नामवंत पक्षनेत्यांच्या कामगिरीची परंपरा मिरवणारा हाच तो पक्ष, असा प्रश्न पडावा अशी वेळ खुद्द पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनीच आणली आहे. राज्यातील पक्षनेतृत्व तरुण आणि आक्रमक असावे या विचाराने काँग्रेस हायकमांडने नाना पटोले यांची पक्षाध्यक्षपदी नेमणूक केली खरी, परंतु आक्रमकपणा म्हणजे वादग्रस्त विधाने आणि पाठोपाठ घुमजाव करणे असा बहुदा पटोलेंचा समज झाला असावा. पक्षाध्यक्षपदी आल्यापासून त्यांनी पक्षसंघटनाकरिता विधायक अशी कोणती कामे केली हा संशोधनाचा विषय ठरावा. मात्र वेळोवेळी त्यांनी केलेली बेताल विधाने आणि त्यातून निर्माण होणारे वाद मात्र कित्येक सापडतील. मागचा-पुढचा कोणताही विचार न करता अलीकडेच त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांच्या संदर्भात दर्पोक्ती केल्यामुळे साहजिकच मोठा वाद निर्माण झाला. भंडारा जिल्ह्यात कार्यकर्त्यांशी बोलताना पटोले यांनी – मी मोदींना मारू शकतो, शिवी देऊ शकतो असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाची चित्रफीत समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आणि स्वाभाविकच त्याविरोधात सर्वच राजकीय पक्षांकडून टीकेचा सूर उमटला. अपवाद अर्थातच फक्त काँग्रेस पक्षाचा. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते पटोलेंच्या या बेताल वक्तव्यामुळे संतापणे स्वाभाविक होते. नानाभाऊ केवळ शारीरिक उंची असून चालत नाही, वैचारिक-बौद्धिक उंची देखील असावी लागते असे म्हणत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी या विधानामागील बौद्धिक दिवाळखोरीवर नेमके बोट ठेवले. या विधानात वापरलेली भाषा अतिशय आक्षेपार्ह व निंदनीय आहे असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी केली. प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्त्यांकडून मात्र हे आरोप फेटाळण्यात आले. पटोले यांचे विधान पंतप्रधान मोदी यांच्यासंदर्भात नव्हतेच असा दावा करण्यात आला. पटोले यांनी हे विधान भाषण देताना नव्हे तर लोकांच्या गराड्यात केले आहे. भंडारा जिल्ह्यात मोदी असे टोपण नाव असलेला गावगुंड असून लोकांच्या तक्रारींसंदर्भात पटोले यांनी हे विधान केले, असे घुमजाव करण्यात आले. संबंधित गुंड पोलिसांच्या ताब्यात असल्याचा दावाही करण्यात आला. परंतु तसे काही नव्हतेच. पटोलेंविरोधात कारवाईची मागणी जोर धरू लागताच उमेश घरडे नामक इसमाला गावगुंड मोदी म्हणून माध्यमांसमोर उभे करण्यात आले. या कथित मोदीला पोलिसांनी आता ताब्यात घेतले असले तरी त्याच्याविरोधात कोणताही गुन्हा वा तक्रारीची नोंद नाही. अंगाशी आलेल्या या प्रकरणात पटोले आता स्वत:चा बचाव कसा करतात ते येत्या काही दिवसांत दिसेलच.