वाहतूक कोंडी बनली गंभीर; नागरिक हैराण

खोपोली : प्रतिनिधी
तत्कालीन मुख्याधिकारी संजय शिंदे यांनी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व शहरात शिस्त लावण्यासाठी फेरीवाले विरोधात कडक धोरण अवलंबले होते. त्याचा परिणाम होऊन खोपोली शहरातील समाज मंदिर रोड, मुख्य बाजारपेठ व रेल्वे स्टेशन रस्त्यावर फेरीवाले फिरकत नसल्याने काही प्रमाणात वाहतूक कोंडी फुटली होती, मात्र संजय शिंदे यांची बदली झाल्यानंतर नवनियुक्त मुख्याधिकारी गणेश शेटे आल्यापासून ते आणि अनेक वरिष्ठ अधिकारी निवडणूक कामात व्यस्त असल्याने, नगरपालिका प्रशासन सुस्त झाले आहे. याचा परिणाम म्हणून येथील फेरीवाले पुन्हा रस्त्यावर आले असून, शहरातील वाहतूक कोंडीची समस्या पुन्हा गंभीर बनली आहे. वाहतूक कोंडी समस्या सुटावी व रस्ते मोकळे व्हावेत म्हणून तीन महिन्यांपूर्वी खोपोली बाजारपेठेमधील अतिक्रमणे तोडण्यात आली, परंतु आता त्याच मोकळ्या जागेत अनधिकृत फेरीवाल्यांनी कब्जा केला असून, त्यामुळे वाहतूक समस्या जैसे थे च राहत आहे. सकाळी व संध्याकाळी खरेदीसाठी होत असलेली गर्दी व त्यात लोकल ट्रेन आल्यावर गर्दीत होणारी भयंकर वाढ व त्यात रस्त्यावर ठाण मांडून असलेले फेरीवाले यामुळे या वेळेत खोपोलीतील स्टेशन रस्ता, बाजारपेठ व समाज मंदिर रस्त्यावर जबरदस्त वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. वाहनतळ नसल्याने बाजारात गर्दीच्या ठिकाणी दुचाकी, ऑटोरिक्षा व कारची वर्दळ वाढली असून, त्यामुळे वाहतूक कोंडी वाढत आहे, तसेच विविध दुकाने व व्यावसायिक गाळ्यांसमोर नियमबाह्य वाहने पार्किंग नागरिकांच्या मार्गातील सर्वात मोठी अडचण बनली आहे.विशेष बाब म्हणजे, फेरीवाले रस्त्यात व वाहतूक कोंडी वाढत असतानाही अनेक वेळा या ठिकाणी एकही वाहतूक पोलीस तैनात नसल्याने समस्या अधिक गंभीर बनली आहे.