रोहे ः प्रतिनिधी
पोषण आहाराविषयी जागृकता आणि शेतीपुरक व्यवसायाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सोमवारी (दि. 11) मढाली बुद्रुक (ता. रोहा) येथील आदिवाशी वाडीवर महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर यांनी प्रास्ताविकात पोषण आहारसंबंधी विवेचन करून आदिवाशी उपयोजनेअंतर्गत कृषी विज्ञान केंद्राने राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली. प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना शिल्पा शिरवाडकर यांनी आदिवाशी शेतकरी व महिलांच्या विकासाकरीता असलेल्या शासकिय योजनांची माहिती दिली. तसेच महिला बचत गटांकरीता असलेल्या स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन केले. तांत्रीक सत्रामध्ये जीवन आरेकर यांनी पोषण आहार, शेतकरी महिलांचे आरोग्य, तसेच तरूणांचा शेतीमधील सहभाग या विषयी मार्गदर्शन केले. तर माधव गीत्ते यांनी मत्स्य शेती विषयी माहिती दिली. डोलवाहळचे सरपंच विश्वनाथ धामणसे आणि माजी सरपंच चंदर कोळी यांनीही मनोगत व्यक्त केले. स्नेहवर्धिनी ट्रस्टच्या सुप्रिया झोलगे यांनी आभार मानले.
अंगणवाडी सेविका सुरेखा धामणसे, राजश्री तळकर, शालेय शिक्षक कदम, मुजमुले, राम कोळी, विकास कोळी यांच्यासह परिसरातील आदिवाशी महिला शेतकरी या मेळाव्याला उपस्थित होत्या.