प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांचे आदेश; प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यास गती
मुंबई : रामप्रहर वृत्त
नवी मुंबई विमानतळ प्रभावित अधिसूचित क्षेत्र (नैना) अंतर्गत ज्या-ज्या टाऊन प्लॅनिंग (टीपी) स्कीमची घोषणा करण्यात आली आहे, त्या सर्व क्षेत्रांतील शेतकऱ्यांच्या हरकतींवर तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रधान सचिव लोकेश चंद्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले तसेच नैना क्षेत्रातील गावांशी संबंधित प्रलंबित विषय तातडीने पूर्ण करून विकासकामांना सुरुवात करण्याबरोबरच शेतकऱ्यांना प्रॉपर्टी कार्ड, त्याचबरोबर गावांसाठी मंजूर करण्यात येणाऱ्या सामाजिक सुविधांचा सविस्तर आराखडा लवकरात लवकर सादर करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.
नैना क्षेत्रातील स्थानिक नागरिक, शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या पुढाकारातून सोमवारी (दि.१५) मुंबई येथे लोकेश चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस दोन्ही आमदारांसह रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शंतनू गोयल तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यापूर्वी लोकप्रतिनिधी, सिडकोचे अधिकारी, सरपंच, ग्रामस्थ आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा करून निर्णय घेण्यात आले होते, मात्र जवळपास एक वर्ष उलटूनही या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी न झाल्याने शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजी होती. त्यामुळे या प्रश्नांच्या तातडीच्या निवारणासाठी आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानुसार आजची बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांनी शेतकरी आणि प्रकल्पग्रस्तांच्या हक्कांशी संबंधित विविध मुद्दे ठामपणे मांडले.
नैना क्षेत्रातील गावांशी संबंधित प्रलंबित विषय तातडीने पूर्ण करून विकासकामांना सुरुवात करण्याचे निर्देश लोकेश चंद्रा यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले तसेच शेतकऱ्यांना त्यांच्या मालमत्तेची प्रॉपर्टी कार्डे वितरित करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच नैना क्षेत्रात येणार असून त्यांच्या हस्ते प्रॉपर्टी कार्डांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहितीही चंद्रा यांनी दिली.
नवीन आंतरराष्ट्रीय विमानतळ कार्यान्वित झाल्यानंतर परिसराच्या विकासाला वेग मिळाला असून या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे सर्व प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत तसेच गावांसाठी मंजूर करण्यात येणाऱ्या सामाजिक सुविधांचा सविस्तर आराखडा लवकरात लवकर सादर करावा, असे आदेशही चंद्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीतील सकारात्मक निर्णयांमुळे नैना क्षेत्रातील शेतकरी, प्रकल्पग्रस्त आणि ग्रामस्थांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांच्या सोडवणुकीला गती मिळणार असून त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper