महाड : प्रतिनिधी
रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ले रायगडावर संवर्धन आणि परिसर विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे. या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या कामाबाबत समाधान व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे संवर्धन म्हणजे एक महायज्ञच असल्याचे फडणवीस यांनी सांगून किल्ल्याचे संवर्धनाचे काम समाधानकारक असल्याचे देखील सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून गेली वर्षभर संवर्धन आणि रायगड परिसर विकासाचे काम शासनाने हातात घेतले आहे. याकरिता शासनाने जवळपास साडे सहाशे कोटी रुपये मंजूर करून रायगड प्राधिकरणाकडे सुपूर्द देखील करण्यात आले. या माध्यमातून रायगडावरील नष्ट होत असलेल्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन, चित्त दरवाजा ते हत्ती तलाव पायरी मार्ग दुरुस्ती, वीज व्यवस्था, गडावरील पिण्याच्या पाण्याची सुविधा, उत्खनन करून जुन्या वस्तू प्रकाशात आणणे या संवर्धनाच्या कामासह रायगड परिसरातील गावातील सुविधा, तेथील रस्ते, पाणी व्यवस्था आदी कामांचा यामध्ये समावेश करण्यात आला आहे. या कामांना प्राधिकरणाने प्रत्यक्ष सुरुवात देखील केली आहे. गडावर होत असलेल्या कामांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी रायगडावर भेट दिली. यावेळी त्यांच्या समवेत रायगड प्राधिकरणाचे अध्यक्ष छत्रपती युवराज संभाजी राजे, भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर, स्थानिक आमदार भरतशेठ गोगावले, माजी कोकण आयुक्त प्रभाकर देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी दहाच्या सुमारास पाचाड येथे राजमाता जिजाऊ यांच्या समाधीचे दर्शन घेऊन चित्त दरवाजा येथे सुरू असलेल्या पायर्यांची कामे आणि चित्त दरवाजा मार्गाची पाहणी करून रायगडावर दाखल झाले. रोप वे ते होळीचा माळ याठिकाणी करण्यात आलेल्या फरसबंदीच्या कामाची पाहणी करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.
याठिकाणी सुरु असलेल्या कामांची माहिती संबंधित अधिकारी आणि प्राधिकरणाचे अध्यक्ष युवराज संभाजी राजे यांनी दिली. यानंतर त्यांनी गडावरील मातीत दबल्या गेलेल्या जुन्या वाड्यांचे उत्खनन, नैसर्गिक पद्धतीने होत असलेले बांधकाम आदींची माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी या कामाबाबत समाधान व्यक्त करून करोडो शिवभक्तांची रायगडाच्या पुनर्वैभवाची मागणी पूर्ण होत असल्याचे सांगितले.
रायगड प्राधिकरण यामध्ये उत्तम काम करत असून शिवसृष्टीसाठी लागणारी 20 एकर जमिनीचे संपादन प्रक्रिया पूर्ण केली जाईल असेही सांगितले. रायगड संवर्धन म्हणजे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याच्या राजधानीचा महायज्ञच असल्याचे मुख्यमंत्री या वेळी म्हणाले.