नागोठणे ः प्रतिनिधी : पेट्रोल पंपावर डिझेल तसेच पेट्रोल शिल्लक नसल्याबाबत पाटी लावली जात असली तरी रात्रीच्या वेळी मात्र मोठ्या ट्रेलर्सना डिझेल दिले जाते व स्थानिक वाहनचालकांकडे दुर्लक्ष केले जाते. याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांच्यासह तालुका सरचिटणीस आनंद लाड, विभागीय अध्यक्ष मोरेश्वर म्हात्रे, हिरामण तांबोळी, राकेश कामथे यांनी केली आहे.
याबाबतचे निवेदन रोहे तहसीलदारांना देण्यात आले असून या निवेदनाची प्रत नायब तहसीलदार तुळवे यांनाही देण्यात आली आहे. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप आहे. या पंपात बहुतांशी वेळा पेट्रोल किंवा डिझेल नसल्याबाबतच्या पाट्या नेहमी झळकत असतात. या पाट्या असतानाही रात्री उशिरानंतर मात्र माणगाव तालुक्यातील एका मोठ्या कंपनीतून माल घेऊन आलेल्या ट्रेलरमध्ये डिझेल भरले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
याबाबत किशोर म्हात्रे यांना विचारले असता 15-15 दिवस डिझेल नसल्याची पाटी लावली असतानाही या ट्रेलर्सना द्यायला यांच्याकडे इंधन येते तरी कोठून, असा सवाल भाजप पदाधिकार्यांनी विचारला आहे. या वाहनांत डिझेल भरतानाच्या व्हिडीओ क्लिप्ससुध्दा आमच्याकडे उपलब्ध असल्याचे पदाधिकार्यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासनाने योग्य ती कार्यवाही न केल्यास जनआंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.