कर्जत : बातमीदार
पावसाने दडी मारल्याने साथीच्या रोगांची लागण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कर्जत शहरातील गुरूनगर भागात डेंग्यूचा रुग्ण आढळल्याने नगरपालिका प्रशासन सतर्क झाले असून शहरात विशेष फवारणी करण्यास सुरुवात झाली आहे.
कर्जत उपजिल्हा रुग्णालयाने त्या डेंग्यूसदृश रुग्णाची माहिती नगराध्यक्षा सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना दिली. त्यानंतर नगराध्यक्षा जोशी आणि इतरांनी गुरूनगर भागात जाऊन तेथील गटारांची पाहणी केली. त्यावेळी तेथील एक भिंत गटारावर पडली असल्याने गटार बंद झाले असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्या भागात मोठ्या प्रमाणात सांडपाणी पसरले होते. नगराध्यक्षा जोशी यांनी तत्काळ नगरपालिकेच्या पथकाला पाचारण केले. त्यांच्याकडून सांडपाणी वाहून नेणारे गटार मोकळे करून घेतले आहे. त्यानंतर आता शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या भागात कीटकनाशक फवारणी सुरू केली आहे. दरम्यान,
डेंग्यूसदृश रुग्णांवर कर्जतच्या बाहेर उपचार सुरू असल्याने त्याचा संसर्ग होणार नाही, अशी माहिती मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दिली.
कर्जत शहरात कुठेही गटारे तुंबून राहणार नाहीत याची काळजी घेण्यात येत असून, सर्व भागात औषध फवारणी केली जाणार आहे. पावसाळ्यात साथीचे आजार बळावू नयेत यासाठी फवारणी करण्याचे काम कायम सुरू ठेवण्यात येईल.
-सुवर्णा जोशी, नगराध्यक्षा