नेरळमध्ये पाकिस्तानी झेंड्याचे दहन
कर्जत : पुलवामामधील हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी नेरळकर शनिवारी रस्त्यावर उतरले. शहरातील शिवाजी महाराज चौकात सर्व जातीधर्माचे लोक आणि देशप्रेमी नागरिकांनी पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी गर्दी केली होती.शिवसेना शाखेमधून कॅण्डल मार्च काढून शिवसैनिक शिवाजी महाराज चौकात पोहचले. त्यानंतर तेथे अनेक कार्यकर्ते आणि पक्षाचे कार्यकर्ते जमले. त्यात तरुण कार्यकर्त्यार्ंचा मोठ्या प्रमाणावर समावेश होता. मुस्लीम समाजातील काही ज्येष्ठ मंडळी नमाज अदा करून या निषेध कार्यक्रमात सहभागी झाली होती. या वेळी पाकिस्तानचा निषेध करणार्या घोषणांनी परिसर दणाणून गेला. त्यानंतर पाकिस्तानचे झेंडे आणि प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.
कशेळेमध्ये बंद पाळून वीर जवानांना श्रद्धांजली
कर्जत : कशेळे ग्रुप ग्रामपंचाय आणि व्यापारी फेडरेशन यांच्या वतीने पुलावामा येथील आत्मघातकी हल्ल्यात शहीद झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी कशेळे बाजारपेठ काही तास बंद ठेवण्यात आली होती. शोकसभेत शहीद जवानची प्रतीकात्मक ज्योत बनवून त्यापुढे कँडल लावण्यात आल्या होत्या. सुरुवातीला व्यापार्यांच्या वतीने उदय पाटील यांनी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करून तरुणांनी यापुढे 14 फेब्रुवारी हा दिवस व्हॅलेंटाइन डे न पाळता शहीद दिन पाळावा, अशी सूचना केली. तसेच या हल्ल्याचे राजकीय भांडवल न करता आपण सर्वांनी सरकारच्या पाठीमागे ठाम उभे राहून या हल्ल्याविरोधात जी काही कारवाई करण्याचा निर्णय घेतील त्याला पाठिंबा देण्याचे आवाहन केले. ग्रामस्थांच्या वतीने तानाजी मते यांनी या हल्ल्याचा निषेध करून हुतात्मा वीर जवानांना आणि चार दिवसांपूर्वी हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू पावलेले कशेळे ग्रामपंचायतीचे माजी तंटामुक्ती गाव अध्यक्ष मधुकर पोखरकर यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतमाता की जय आणि वीर जवान अमर रहे, या घोषणांनी शोकसभेची सांगता करण्यात आली. जि. प. सदस्या रेखा दिसले, पं. स. सदस्या सुरेखा हरपुडे, सरपंच हर्षला राणे यांच्यासह ग्रामस्थ तसेच आपली कशेळे गावातील व्यापारी दुकाने बंद ठेवून श्रद्धांजली सभेला उपस्थित होते.
मानिवली हुतात्मा स्मारकात जवानांना श्रद्धांजली
कर्जत : पुलवामामध्ये सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संपूर्ण मानिवली (ता. कर्जत) गावात कॅण्डल मार्च काढण्यात आला. त्यानंतर मानिवली हुतात्मा स्मारकात जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.सर्वप्रथम स्मारकामध्ये हुतात्म्यांना सार्वजनिक श्रद्धांजली वाहून प्रत्येकाने हातात मेणबत्ती घेऊन जवानांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून संपूर्ण गावामध्ये घोषणा देत कॅण्डल मार्च काढला. मानिवलीचे सरपंच प्रवीण पाटील, माजी सरपंच बबलू डायरे, माजी उपसरपंच प्रीतम डायरे, रमेश पाटील, संकेत पाटील, हुतात्मा स्मारक समितीचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी, विठ्ठल पाटील, पोलीस पाटील रामचंद्र गवळी, सुधाकर डायरे, जितेंद्र गवळी, विशाल डायरे, अतुल डायरे, प्रदीप पाटील यांच्यासह ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रवीण डायरे, मंगेश डायरे, नितीन भोईर, अनंता गवळी आदी तरुणांनी पुढाकार घेतला होता.
वडगावात शहिदांना श्रद्धांजली
पेण : तालुक्यातील वडगाव येथील नवतरुण सामाजिक मित्र मंडळ आणि ग्रामस्थांनी पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. वडगावातील तुळजा भवानी मंदिरात झालेल्या या शोकसभेत राजेंद्र गोरे आणि मोहिनी गोरे, तसेच मंडळाचे रूपेश म्हात्रे, अरविंद पाटील यांनी शहिदांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना तसेच जखमी जवानांना आपण कशी मदत करू शकतो याबद्दल मनोगत व्यक्त केले आणि अतिरेकी हल्ल्याचा धिक्कार करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.
साळाव येथे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
रेवदंडा : मुरुड तालुक्यातील साळाव ग्रामपंचायतीच्या वतीने पुलवामा हल्लात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. साळाव येथील जेएसडब्ल्यू कंपनीचे माजी कर्मचारी कर्नल नोएल एलिस हे पत्नीसह या वेळी उपस्थित होते. साळाव सरपंच नीलम पाटील, ग्रा.पं.सदस्य वैभव कांबळी, योगिता शेट्टी, दत्ता पाटील, राजू वाघमारे, दिनेश बापळेकर, दीपिका पाटील, तनुजा बापलेकर, हेमा साळावकर, मंजुळा वाघमारे तसेच सय्यद खान, सिराज दाखवे, नितेश पाटील यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमाचे नियोजन सामाजिक कार्यकर्ते सागर पाटील, गणेश कांबळी, रूपेश पाटील यांनी केले होते. सूत्रसंचालन राजेंद्र नाईक यांनी केले. यानंतर पुलवामा हल्लाच्या निषेधार्थ रॅली काढण्यात आली. या वेळी भारतमाता की जय, वंदे मातरम व पाकिस्तान मुर्दाबाद, अशा घोषणा देण्यात आल्या. मारुती मंदिराच्या प्रांगणात रॅलीचे आगमन झाल्यावर तेथे शहीद जवानांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
नांदगावमध्ये शहीद जवानांना श्रद्धांजली
मुरुड : दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना नांदगाव (ता. मुरुड) च्या ग्रामस्थांनी मराठी शाळेच्या पटांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याशेजारी मेणबत्त्या पेटवून तसेच कॅण्डल मार्च काढून श्रद्धांजली अर्पण केली. माजी उपसरपंच राजेश साखरकर, राजेश पाटील, विनोद जोशी आदींनी आपल्या भाषणातून भारतीय जवानांमागे खंबीरपणे उभे राहण्याचे व सद्यस्थितीत शांतता पाळण्याचे आवाहन केले. ग्रामपंचायत सदस्य विकी कुबल, शिवसेनेचे माजी विभागप्रमुख सुदेश घुमकर, राज पवार, स्वप्नील चव्हाण यांच्यासह तरुण व ग्रामस्थ या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.