Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा

राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सभापती, प्रदेशाध्यक्षांसह अनेक मान्यवरांकडून शुभेच्छा

पनवेल : रामप्रहर वृत्त
समाजहिताची भूमिका समर्थपणे निभावणारे आणि कार्यसम्राट म्हणून ओळखले जाणारे समाजप्रिय नेतृत्व आमदार प्रशांत ठाकूर यांचा वाढदिवस यंदाही सामाजिक बांधिलकी जपत मंगळवारी (दि. 5) विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या विशेष दिवशी आमदार प्रशांत ठाकूर यांनी वडील माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आई शकुंतला ठाकूर यांचे आशीर्वाद घेतले. त्यानंतर पनवेलमधील मार्केट यार्ड येथे त्यांना शुभेच्छा देण्यासाठी हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी गर्दी केली होती.
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यातील अनेक मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह इतर मंत्री, खासदार, आमदार, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, प्रशासकीय, विधी, पत्रकारिता, वैद्यकीय, संगीत, नाट्य, सामाजिक संस्था, संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकार्‍यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे अभीष्टचिंतन केले.
या वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम आयोजित करण्यात आले होते. यात आरोग्य शिबिरे, स्वच्छता मोहिमा, शैक्षणिक मदत वाटप, महिला सक्षमीकरण कार्यक्रम आदींचा समावेश होता. या उपक्रमांद्वारे आमदार प्रशांत ठाकूर यांनी जनतेप्रती असलेली बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली. वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष पनवेल व सीकेटी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महारोजगार मेळावा 2025, भाजप खिडूकपाडा, कामगार नेते प्रभूदास भोईर व सुरेश भोईर यांच्या वतीने रुग्णसेवेसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा लोकार्पण, जाणीव एक सामाजिक संस्था आणि सखी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार चषक भव्य बुद्धिबळ व कॅरम स्पर्धा, भाजप प्रभाग 19 आणि जे.एम. म्हात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर, भाजप रायगड जिल्हा सांस्कृतिक सेलच्या वतीने गदिमा आणि बाबूजींच्या अजरामर कार्याला मानवंदना असलेल्या ज्योतीने तेजाची आरती हा संगीतमय कार्यक्रम, जागृती फाऊंडेशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर, खारघरचा राजा मंडळाच्या वतीने महाराणी पैठणीची कार्यक्रम तसेच महिलांसाठी विविध स्पर्धा आणि साडी वाटप, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल, नादब्रम्ह साधना मंडळ खारघर आणि पनवेल तालुका सांस्कृतिक सेल यांच्या संयुक्त विद्यमाने शास्त्रीय व सुगम संगीत सुश्राव्य मैफिल, शिवतेज मित्र मंडळ व साबाई माता महिला मंडळ खारघरच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिर, भाजप कळंबोलीच्या वतीने आमदार प्रशांत ठाकूर यांची ग्रंथतुला तसेच सामाजिक व शैक्षणिक कार्यक्रम, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या वतीने धाकटा खांदा येथील शाळेत चित्रकला स्पर्धा, भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहराच्या वतीने लोकनेते दि.बा. पाटील विद्यालय महापालिका शाळा क्रमांक 1मधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, खारघर स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे प्री इंटर स्कूल बास्केटबॉल स्पर्धा, गुड मॉर्निंग 40 प्लस आदई वलप विभाग व भाजप पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने क्रिकेट स्पर्धा, आरपीआयचे पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे यांच्या वतीने रक्तदान तसेच पॅनकार्ड व आधार कार्ड शिबिर, नवीन पनवेल येथे माजी नगरसेविका वृषाली वाघमारे यांच्या वतीने विविध कामांचे लोकार्पण, आयुष्यमान भारत कार्ड वाटप आणि विद्यार्थ्यांना वह्या वाटप, भारतीय जनता युवा मोर्चा प्रभाग क्रमांक 14च्या वतीने स्वच्छतादूतांना रेनकोट व टिफिन वाटप, रत्नदीप स्पोर्ट्स क्लबच्या वतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव तसेच शाळेतील विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना छत्री वाटप, खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या आयोजनातून सवलतीच्या दरात वॉटर फिल्टर, विकासकामांचे लोकार्पण, तसेच विविध मंडळांत वृक्षारोपण असे अनेक सामाजिक उपक्रम आयोजित करत वाढदिवस समाजोपयोगी पद्धतीने साजरा करण्यात आला.

नमस्कार, आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा… एक कार्यकुशल आणि विकासाभिमुख लोकप्रतिनिधी म्हणून आपण पनवेल विधानसभा मतदारसंघ आणि रायगड जिल्ह्याच्या विकासासाठी उत्तम योगदान देत आहात. हे कार्य अशाच उत्तम प्रकारे यापुढेही सुरू रहावे; लोकसेवेचा आपला मार्ग उत्तरोत्तर अधिक प्रशस्त होत जावा आणि त्यासाठी सर्वशक्तिमान परमेश्वराने आपणांस आरोग्यसंपन्न, उत्साहपूर्ण, यशस्वी दीर्घायुष्य प्रदान करावे हीच आजच्या दिनी शुभकामना…
-राम शिंदे, सभापती, महाराष्ट्र विधान परिषद

सामाजिक भान जपणारा वाढदिवस
राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रेरणेतून आमदार प्रशांत ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून एक सामाजिक उत्सव घडवून आणला. भव्य जाहिराती, होर्डिंग-बॅनर यावर खर्च करण्याऐवजी त्यांनी कार्यकर्त्यांना सामाजिक उपक्रम राबवण्याचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी आरोग्य शिबिर, रोजगार मेळावे, खेळ स्पर्धा, तसेच शालेय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे वाढदिवस साजरा होण्याच्या पारंपरिक चौकटीपलीकडे जाऊन हा दिवस एक सामाजिक योगदानाचा उत्सव ठरला. जनतेच्या प्रश्नांशी जोडलेपण, समाजोपयोगी दृष्टिकोन आणि विधायक उपक्रमांची निवड हे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाचे खास वैशिष्ट्य ठरते. त्यांच्या या आगळ्यावेगळ्या वाढदिवसाने जनतेच्या मनात अधिक विश्वास निर्माण केला आहे.

Check Also

लोकनेते रामशेठ ठाकूर समाजसेवेतील हिरा -आमदार रविशेठ पाटील

जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या मूट …

Leave a Reply