Breaking News

रायगड सुरक्षा मंडळातील कामगारांना भरघोस वेतनवाढ

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल ः प्रतिनिधी

रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील कामगारांना वेतनवाढ देण्याचा निर्णय झाला असून, यासाठी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.

रायगड सुरक्षा मंडळातील व नवी मुंबई मंडळातील सुरक्षा रक्षकांच्या वेतनात व सुविधांमध्ये फरक असल्याने समान कामाला समान वेतन मिळाले पाहिजे, या उद्देशाने रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांना मुंबई व नवी मुंबईतील सुरक्षारक्षकांप्रमाणेच वेतनवाढ व इतर सोयीसुविधा मिळाव्यात, अशी मागणी सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा कामगार आघाडीने सुरक्षा रक्षक मंडळाकडे केली होती. यासंदर्भात सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे कामगारमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यावर कामगारमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन 1 जानेवारी 2019पासून सुरक्षा रक्षकांच्या वेतनामध्ये सुमारे पाच ते सात हजारांची वेतनवाढ करण्याचा निर्णय घेतला. त्या अनुषंगाने सुरक्षा रक्षकांच्या पगारात व भत्त्यांमध्ये वाढ झाली आहे. मूळ वेतन, विशेष भत्ता, घरभाडे, प्रवास भत्ता, शैक्षणिक भत्ता, रजाकालीन प्रवास, धुलाई भत्ता, लेव्हीनुसार दरमहा सुरक्षा रक्षकांना 22,797, मुख्य सुरक्षा रक्षकांना 23,248, सुरक्षा पर्यवेक्षकांना 24,393, साहाय्यक सुरक्षा अधिकार्‍यांना 24,761, सुरक्षा अधिकार्‍यांना 25,499, तर मुख्य सुरक्षा अधिकार्‍यांना 26,235 रुपये वेतन मिळणार आहे. ही वेतनवाढ 1 जानेवारीपासून पुढील तीन वर्षांकरिता पुनःनिर्धारित करण्याचे मान्य करून त्याप्रमाणे वेतन व भत्ते संबंधित सुरक्षा रक्षक, अधिकार्‍यांना देण्यात येणार असून, जानेवारीपासूनच्या पगाराची तफावतही सुरक्षा रक्षकांना मिळणार आहे.

मंगळवारी (दि. 11) रायगड सुरक्षा रक्षकांच्या पगारवाढीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील सुरक्षा रक्षकांचे प्रतिनिधित्व करणार्‍या संघटना व रायगड सुरक्षा रक्षक मंडळातील अधिकार्‍यांची संयुक्त बैठक रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाचे चेअरमन निलेश दाभाडे तसेच मंडळाचे सचिव आनंद भोसले यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यालयात पार पडली.   रायगड जिल्हा सुरक्षा रक्षकांना पगार व इतर सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून जय भारतीय जनरल कामगार संघटना, वंदे मातरम् जनरल कामगार संघटना व भाजप रायगड जिल्हा कामगार आघाडीचे अध्यक्ष जितेंद्र घरत, उपाध्यक्ष रवी नाईक, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, सरचिटणीस मोतीलाल कोळी, कार्यालयीन सचिव समीरा चव्हाण यांनी संबंधित कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. या वेतनवाढीचा रायगड जिल्ह्यातील सुमारे 1900 सुरक्षा रक्षकांना फायदा होणार असल्यामुळे सुरक्षा रक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply