Breaking News

पनवेल महापालिकेची स्वतंत्र पोलिओ लसीकरण मोहीम

पनवेल : बातमीदार

केंद्र सरकारच्या पोलिओ मोहिमेंतर्गत पनवेल महापालिका 16 जून रोजी पोलिओ लसीकरण मोहीम राबविणार आहे. पनवेल महापालिकेच्या स्थापनेनंतर ही मोहीम पहिल्यांदाच राबविण्यात येणार आहे. पुरेसे मनुष्यबळ नसतानाही महापालिका क्षेत्रातील प्रत्येक बालकाला लसीकरण करण्यासाठी महापालिका प्रशासनाने कंबर कसली आहे.

पनवेल तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, सिडकोच्या आरोग्य विभागांतर्गत महापालिकेच्या स्थापनेपूर्वी पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत होती. अडीच वर्षांपूर्वी महापालिकेची स्थापना झाल्यानंतर पनवेल तालुक्यातील 29 गावे आणि सिडकोच्या खारघर, कळंबोली, नावडे, तळोजे, नवीन पनवेल, खांदा कॉलनी आदी भागांची जबाबदारी पनवेल महापालिकेवर येऊन पडली आहे. केंद्र सरकारच्या उपराष्ट्रीय पोलिओ अभियानात पनवेल महापालिका क्षेत्रातही पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातही 16 जून रोजी सकाळी 8 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.

महापालिकेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी, आशा वर्कर्स, इतर कर्मचारी, ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी, सामाजिक संस्था, नर्सिंग कॉलेजची मुले यांच्या सहकार्याने हे अभियान राबविण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने तयारी केली आहे. मंगळवारी या मोहिमेचा आढावा घेण्यासाठी उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी बैठक आयोजित केली होती. महापालिकेच्या घंटागाड्यांवरील स्पीकर, रिक्षा, जाहिरात फलक यांच्या माध्यमातून पोलीस मोहिमेत शून्य ते पाच महिन्यांच्या बालकांना लसीकरण करण्यासाठी आवाहन करणार असल्याची माहिती दिली. 16 जून रोजी 90 टक्के बालकांना लसीकरण पूर्ण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले असून पुढील पाच दिवसांत उर्वरित 10 टक्के बालकांना लसीकरण करू, असा विश्वास त्यांनी या बैठकीत व्यक्त केला. यासाठी 942 कर्मचारी राबणार असून 341 बुथवर लसीकरण करण्यात येणार आहे. महत्त्वाचे बसथांबे, रेल्वेस्थानकांचा यात समावेश असेल, अशी माहिती महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्ञा नरवाडे यांनी दिली.

महापालिका स्वतंत्रपणे पहिल्यांदाच पोलिओ लसीकरण मोहीम राबविणार आहे. जास्तीत जास्त जनजागृती करून आम्ही ही लसीकरण मोहीम यशस्वी करू. भविष्यातही भारत पोलिओमुक्त ठेवण्यासाठी नागरिकांनीदेखील महापालिकेला सहकार्य करावे.

-संध्या बावनकुळे, उपायुक्त

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply