पेण : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरून पेण शहरात जाणार्या मार्गावर करण्यात येत असलेल्या कामामुळे तेथून पेण शहरात जाणारी ‘एन्ट्री’ बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मोठ्या वाहनांना तरणखोप बायपास मार्गे पेण-खोपोली मार्गावरून पेण शहरात यावे लागत आहे.
मुंबई-गोवा महामार्गाचे रूंदीकरण करण्यात येत आहे. या महामार्गावरील रामवाडी येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या कामासाठी पेण रेल्वेस्थानक येथे रस्ता खोदण्यात आला आहे. त्यामुळे हा मार्ग ट्रक, बस, एसटी यासारख्या मोठ्या वाहनांसाठी बंद करण्यात आला आहे. या मोठ्या वाहनांना तरणखोप गावाजवळील पेण-खोपोली बायपासवरून पेण-खोपोली रोडमार्गे चार ते पाच किलोमिटरचा वळसा मारून पेण शहरात प्रवेश करावा लागत आहे. त्यामुळे एसटी बस चालक, तसेच प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. अलिबाग, श्रीवर्धन, महाड व कोकणातून येणार्या प्रवाशांना रेल्वे स्थानकाजवळ उतरून पेण शहरात यावे लागत आहे. तसेच पेण बस स्थानकातून तालुक्यातील गावांत जाणार्या मोठ्या वाहनांनादेखील हा वळसा मारूनच प्रवास करावा लागत आहे.