Breaking News

काळानुरूप बदल व्हावेत

अलीकडच्या काळात प्रश्नपत्रिकांच्या स्वरूपात झालेले काही बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत. घोकंपट्टीवरचा भर कमी होऊन मुलांमधील वाचन, मनन, विश्लेषण आदी कौशल्यांचे अवलोकन केले जाऊ लागले आहे, परंतु तरीही सुधारणेला अद्यापही बराच वाव आहे. सीबीएसई बोर्डाने परीक्षा केंद्र शोधण्यासाठी अ‍ॅपचा वापर, ऑनलाईन प्रवेशपत्रिका आदींबाबत पुढाकार घेतला आहे.

राज्य शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा सुरू झाली आहे आणि दहावीची पुढच्या आठवड्यात सुरू होईल. गेले कित्येक दिवस या न त्या कारणाने या दोन्ही परीक्षा सतत बातमीत आहेत. दरवर्षीच असतात. पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशांकरिता असणार्‍या अटीतटीच्या जीवघेण्या स्पर्धेमुळे या परीक्षांना आपण सारेच अफाट महत्त्व देतो. हे काहीसे अवाजवी आहे असा सूर गेली काही वर्षे लागत असला तरी एका अपरिहार्यतेतून कुणालाच त्यासंदर्भात अन्य काही पर्याय चोखाळता येत नाहीत. एसएससी बोर्डाने विशेष गरजा असलेल्या दोन विद्यार्थिनींना परीक्षेत संगणक वापरण्यास परवानगी दिल्याचेही बरेच कौतुक झाले आहे, पण त्याच वेळी संगणक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत एसएससी बोर्डाची गती इतकी धिमी का, असा सवालही केला जातो आहे. खरोखरच आताच्या पिढीची संगणक तंत्रज्ञान वापरण्यातली अफाट गती लक्षात घेऊन परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल व्हायला नकोत का? विशेषतः भाषा विषयांच्या प्रश्नपत्रिका पूर्ण होण्याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये वेळेच्या अपुरेपणाबद्दल बराच ताण दिसून येतो. बोर्डाच्या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांकडून यासंदर्भात सर्वाधिक कॉल आल्याचेही उघड झाले आहे. हात कितीही दुखत असला तरी अजिबात न थांबता लिहीत राहण्याचा दबाव विद्यार्थ्यांवर आणून नेमके काय साधले जाते? कोणत्या कौशल्याची चाचणी घेतली जाते यातून? वास्तवात पुढे कारकिर्दीत सारे कामकाज संगणकावरच केले जात असताना निव्वळ शाळा-कॉलेजांतील विद्यार्थ्यांवर तीन-चार तास सलग लिहिण्याचा जुलूम कशासाठी? भाषासंबंधी कौशल्य तपासायचे असताना वेळेचा दबाव ठेवण्यामागचा हेतू स्पष्ट होत नाही. अकारण भाषा विषयांबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनास्था वा नापसंतीची भावना मात्र निर्माण होते. पूर्वापार जे चालत आले आहे, ते सुरू ठेवायचे, बदल करण्यास धजावायचे नाही वा गैरप्रकारांच्या भीतीपोटी नव्या पर्यायांचा विचार करायचा नाही ही वृत्ती यामागे दिसते. वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचण्याचा आग्रहही ठीक असला, तरी आपल्याकडील वाहतुकीची परिस्थिती किती वाईट असते हेही लक्षात घ्यायला हवे. दोन-एक महिन्यांपूर्वी सायन येथे परीक्षेसाठी वेळेवर पोहोचण्याच्या घाईत तुडुंब भरलेल्या लोकलमध्ये चढलेल्या दोघा कॉलेज तरुणांचा लोकलमधून पडून मृत्यू झाल्याचेही दिसून आले होते. परीक्षेच्या अवतीभवतीची एकंदर परिस्थिती पाहून या संदर्भातील नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी. पहिल्याच दिवशी केंद्रावर उशिरा पोहोचलेले सहा विद्यार्थी परीक्षेला मुकल्याचे समोर आले आहे. या विद्यार्थ्यांना आता पुरवणी परीक्षेला बसता येईल, परंतु या अशा घोळांचा विद्यार्थ्यांच्या एकंदरच मानसिक आरोग्यावर किती परिणाम होतो त्याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. विद्यार्थ्यांकडून सर्व प्रकारच्या नियमांचे काटेकोर पालन व्हावे अशी अपेक्षा करणारी व्यवस्था आपल्या बाजूने कामगिरीत तेवढीच काटेकोर दिसून येते का? पेपरफुटीच्या बाबतीत मंडळ हतबल दिसणार. नव्या अभ्यासक्रमाची पुस्तके बाजारात येण्यास होणार्‍या विलंबापासून निकालांच्या दिरंगाईपर्यंत व्यवस्थेतील सार्‍या त्रुटी विद्यार्थ्यांनी मात्र खपवून घ्यायच्या. हे असेच किती काळ चालणार?

Check Also

शेकाप माजी नगरसेवक सुनील बहिराचा भाचा रूपेश पगडेच्याही मुसक्या पोलिसांनी आवळल्या

महिलांना जबरी मारहाण व दमदाटी भोवली पनवेल : रामप्रहर वृत्त बांधकाम मटेरियल सप्लायवरून वाद करीत …

Leave a Reply