पनवेल : रामप्रहर वृत्त : येथील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी विद्यालयाच्या इंग्रजी माध्यम पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने शुक्रवारी जागतिक योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी योग शिक्षिका रश्मी रामगरीया यांना आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रामगरीया यांचा सत्कार इंग्लिश मीडियम प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका उज्ज्वला कोटीयन यांनी केला.
योग शिक्षिका रश्मी रामगरीया यांनी योगाचे महत्त्व सांगून प्रात्यक्षिकांद्वारे उपस्थित विद्यार्थ्यांना विविध आसनांबाबत मार्गदर्शन केले. यामध्ये विद्यार्थ्यांनी उभ्या, बैठ्या आणि निद्रा स्थितीतील ताडासन, पादहस्तासन, अर्धचक्रासन, त्रिकोनासन, भद्रासन, शशांकासन, वक्रासन, भुजंगासन, शलभासन, मक्रासन, सेतुबंधासन, शवासन, कपालभाती, अनुलोम-विलोम, भ्रामरी, ध्यान आदी योगासनांचे प्रकार करून योग दिनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या योग कलाविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. मुख्याध्यापिका सौ. कोटीयन म्हणाल्या की, मुनष्याला आज धकाधकीच्या जीवनात ताणतणावातून मुक्त होण्यासाठी योग अभ्यास व सराव आवश्यक आहे. मानवजातीच्या कल्याणासाठी ॠषीमुनींनी प्राणायमाचा आविष्कार केला. ताण-तणावांचे प्राणायमाच्या माध्यमातून व्यवस्थापन करता येते. या वेळी शिक्षक वर्ग उपस्थित होता.