पनवेल : वार्ताहर : संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान व केएलई महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कळंबोली येथील केएलई महाविद्यालयामध्ये मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये योगाचे महत्त्व, योगासनांच्या प्रकारांची प्रात्यक्षिके दाखविण्यात आली व उपस्थित प्रशिक्षणार्थींनी स्वतः आसनांचे प्रकार करून सराव केला. योग प्रशिक्षिका प्रज्ञा सहस्त्रबुद्धे यांनी सर्वांना योग विषयाची विस्तृत माहिती दिली.
यावेळी बोलताना मार्गदर्शन शिबिराचे उद्घाटक तथा कोकण म्हाडाचे सभापती बाळासाहेब पाटील म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात व रोजच्या स्पर्धेच्या
जगात आपण स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत नाही, परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांमध्ये योग क्रांती घडवत, योगाचे महत्त्व पटवून देत, योग दिनाच्या निमित्ताने योगाविषयी जनजागृती केली आहे. योग म्हणजे आपली संस्कृती आहे, परंपरा आहे. आता तर संपूर्ण जगाने योग स्वीकारला आहे. पनवेल महानगरपालिकेचे उपमहापौर विक्रांत पाटील यांनी सांगितले की, आपण युवा आहोत व आयुष्यात बरंच काही करण्याच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होतील, परंतु आपले शरीर स्वस्थ असेल तरच आपण या संधीचं सोनं करू शकू. आपण सर्वांनी आज योग शिकून शांत न राहता रोजच्या जीवनात योगाचा उपयोग केला पाहिजे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठानचे पदाधिकारी तानाजी खंडागळे, सुभाष कदम, समीर कदम, देविदास खेडकर, प्रशांत कदम, उदय पाटील, विक्रम ठाकूर, नीलेश वाडेकर, किरण जाधव, किरण मोरे, समीर अंबोकर आदींनी विशेष मेहनत घेतली. यावेळी कळंबोलीच्या नगरसेविका मोनिका महानवर केएलई महाविद्यालयाचे मुख्याध्यापक दिनकर गीते, चंद्रमोहन मोरया आदी मान्यवर उपस्थित होते. आगामी काळातही बाळासाहेब पाटील लोकसेवा प्रतिष्ठान व युवा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या वतीने अशा अनेक समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानच्या पदाधिकार्यांनी दिली.