लंडन : वृत्तसंस्था
बाबर आझमची संयमी शतकी खेळी आणि त्याला हारिस सोहेल-मोहम्मद हाफीजने दिलेल्या साथीच्या जोरावर पाकिस्तानने न्यूझीलंडवर सह गडी राखून मात केली. 238 धावसंख्येचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली होती, पण आझमने आधी हाफिज आणि त्यानंतर सोहेलच्या साथीने भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
न्यूझीलंडला 237 धावांवर रोखल्यानंतर पाकिस्तानच्या डावाची सुरुवातही खराब झाली. सलामीवीर फखार झमान आणि इमाम उल-हक फारशा धावा न करता माघारी परतले. अशा वेळी बाबर आझमने खेळपट्टीवर तळ ठोकत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. त्याने मोहम्मद हाफिजसोबत 66, तर हारिस सोहेलसोबत शतकी भागीदारी रचत संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. आझमने नाबाद 101 धावांची खेळी केली. सोहेलने 68 धावा केल्या न्यूझीलंडचे गोलंदाज सपशेल अपयशी ठरले. ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन आणि कर्णधार केन विल्यमसन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. तत्पूर्वी, मधल्या फळीत जिमी निशम आणि कॉलिन डी-ग्रँडहोम या खेळाडूंनी रचलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर न्यूझीलंडने, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात 237 धावांपर्यंत मजल मारली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा न्यूझीलंडचा निर्णय पुरता फसला. शाहीन आफ्रिदीच्या भेदक मार्याच्या जोरावर न्यूझीलंडचा निम्मा संघ 83 धावांत माघारी परतला होता. यानंतर निशम आणि डी-ग्रँडहोम यांनी भागीदारी रचत संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठून दिली. दोघांनीही आपली अर्धशतके साजरी केली. संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून दिल्यानंतर डी-ग्रँडहोम धावबाद होऊन माघारी परतला. निशमने सँटरनच्या साथीने संघाला 237 धावांचा टप्पा गाठून दिला. निशमने नाबाद 97 धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने तीन, तर मोहम्मद आमिर आणि शाबाद खान यांनी प्रत्येकी एक बळी टिपला. न्यूझीलंडचा एक खेळाडू धावबाद झाला.