पंतप्रधान नरेंद्र मोदींची विठ्ठलाकडे प्रार्थना
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
आषाढी एकदशीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे, अशी प्रार्थना बुधवारी (दि. 1) विठ्ठलाकडे केली. विशेष म्हणजे पंतप्रधानांनी जय जय पांडुरंग हरी म्हणत मराठीतून सर्वांना आषाढी एकदशीच्या शुभेच्छा दिल्या.
आषाढी एकदशी म्हटली की डोळ्यांसमोर येते गजबजलेले पंढरपूर, वारकर्यांच्या अलोट गर्दीने भरून गेलेली चंद्रभागा, आसमंतापर्यंत पोहचणारा विठ्ठलाचा गजर, मात्र यंदा कोरोनामुळे लेकुरवाळ्या विठू माऊलीची भक्तांसोबतची भेट चुकली. संतांच्या पादुकाही एसटी बसमधून विठ्ठलाच्या भेटीला गेल्या. एकंदर या सोहळ्यावर यंदा कोरोनाचे सावट होते. असे असले तरी वारकरी आणि भाविकांनी परिसरातील विठ्ठल मंदिरांत जाऊन दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आषाढी एकादशीनिमित्त मराठीतून ट्विट केले. यात त्यांनी संत परंपरेला उजाळा देत म्हटले की, आषाढी एकादशी म्हणजे वारकरी परंपरेचे स्मरण करण्याचा दिवस. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम आणि इतर अनेक संत ज्यांनी समानता आणि सामाजिक सलोखा यांची शिकवण देत आपल्याला सदैव प्रेरणा दिली, अशा सर्व संतांना नमन. आषाढी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा! विठ्ठलाच्या आशीर्वादाने गरीब आणि वंचितांना उत्तम आरोग्य आणि भरभराट लाभो. आपले जग आनंदी आणि आरोग्यदायी राहावे या आपल्या निर्धाराला विठ्ठलाचे आशीर्वाद राहोत हीच विठ्ठलचरणी प्रार्थना. जय जय पांडुरंग हरी. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनीही मराठीतून आपल्या भावना व्यक्त करीत आषाढी एकादशीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यंत्र्यांचेही विठूरायाला साकडे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यात आली. त्यांच्यासोबत महापूजेचा मान अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील चिंचपूर-पांगुळ येथील विणेकरी विठ्ठल ज्ञानदेव बढे आणि अनसूया बढे या वारकरी दाम्पत्याला मिळाला. या वेळी ठाकरे यांनी महाराष्ट्रासह अवघ्या जगाला कोरोनामुक्त कर आणि बळीराजाला सुख, समाधान आणि भरभराट येऊ दे, असे साकडे विठ्ठलाच्या चरणी घातले.