Breaking News

गुप्तचर अधिकारी रायगडात

आपट्यातील बॉम्ब प्रकरणाचा छडा लावण्यासाठी कसून तपास

अलिबाग : प्रतिनिधी

आपटा येथे एसटी बसमध्ये सापडलेल्या बॉम्ब प्रकरणाचा छडा लावण्यासाठी गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. रायगड पोलीस दलाबरोबरच  एटीएस व आयबी या गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी जिल्ह्यातील महत्त्वाच्या ठिकाणांवर तपासणी करीत आहेत.

आपटा येथे एसटी बसमध्ये बॉम्ब सापडल्यानंतर राज्यभरात  सर्वच तपास आणि सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. हा बॉम्ब बसमध्ये कोणी ठेवला हे शोधण्याचे आव्हान यंत्रणांसमोर आहे. जिल्ह्यात एटीएस व आयबी या गुप्तचर यंत्रणांचे अधिकारी दाखल झाले आहेत. एसटी बसमध्ये सापडलेला बॉम्ब या क्षेत्रातील प्रशिक्षित व्यक्तीने बनविला असावा,  असे बोलले जात आहे.

बॉम्ब कोणी ठेवला याचा तपास पोलीस करीत आहेत. यासाठी बॉम्ब ठेवलेल्या पिशवीवरील व एसटीमध्ये ती व्यक्ती बसलेल्या ठिकाणाचे ठसे पोलिसांनी घेतले आहेत.  कर्जत-आपटा ही बस ज्या ज्या मार्गावरून आली, त्या मार्गावरील असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मिळविण्याचा प्रयत्न एटीएस अधिकारी करीत आहेत.

एकूणच रायगडची पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, ठिकठिकाणी बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. विशेषकरून किनारपट्टीवर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. सर्व हालचालींवर यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.

मुंबईसह महाराष्ट्रात सतर्कता

येत्या तीन महिन्यांत मुंबईतील रेल्वेस्थानकांवर महिन्यात दहशतवादी हल्ल्याचा इशारा भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिला आहे. या इशार्‍यानंतर सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा अलर्ट जारी करण्यात आला आहे. दशतवादी समुद्रमार्गे मुंबईत घुसण्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली आहे. त्यामुळे मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात पोलीस यंत्रणा सतर्क आहेत.

नागरिकांनो, दक्ष राहा!

तुम्ही प्रवासात असाल, एखाद्या मॉलमध्ये गेला असाल, कुठल्याही गर्दीच्या ठिकाणी गेला असाल; तर आजूबाजूला काय घडतेय याकडे जरा डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवा. सावध राहा, सतर्क राहा. आगामी काळात होणार्‍या निवडणुका पाहता दहशतवादी हल्ल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने सतर्क राहण्याची गरज आहे, असे आवाहन सुरक्षा यंत्रणांनी केले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply