Breaking News

जेएनपीटीचा ‘चौकार’; चौथ्यांदा पटकाविला उत्कृष्ट बंदर पुरस्कार

उरण : प्रतिनिधी – देशातील पहिल्या क्रमांकाचे बंदर असलेल्या जेएनपीटीने चौथ्या इंडिया मेरीटाईम पुरस्कार समारंभात या वर्षीचा उत्कृष्ट बंदर पुरस्कार पटकावून मानाचा तुरा शिरपेचात रोवला आहे. या श्रेणीमध्ये देशातील उत्तम बंदरांना नामांकन मिळाले असून, जेएनपीटीने हा पुरस्कार जिंकला.

उत्कृष्ट बंदर पुरस्कार श्रेणीमध्ये मालाची हाताळणी, वार्षिक वाढ, विस्तार योजना, नवीन पुढाकार, कार्गो हाताळणी, उपकरणे हाताळणी, ई-बिझिनेस आणि ग्राहक समाधानासारख्या विविध स्तरांचे मूल्यांकन केले जाते. जेएनपीटीने या सर्व स्तरावर उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. वित्तीय वर्षात कंटेनर हाताळणीमध्ये पाच दशलक्ष टीईयू पार करून मैलाचा दगड पार केला, तसेच अनेक योजना हाती घेण्यात आल्या. ज्यामध्ये चौथ्या टर्मिनलचा विकास, मेगा रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रोजेक्ट, ड्रेजिंग,नॅव्हिगेशनल चॅनेल, ड्राय पोर्ट्स, जेएनपीटी-एसएसझेड प्रकल्प, ऑटोमेशन आणि डिजिटायझेशन सुविधा यांसारख्या अनेक प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून पोर्टचे विस्तारीकरण आणि कामकाजातील कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत.

 जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले, तसेच जेएनपीटीला तीस वर्षांच्या समुद्री क्षेत्रासाठी दिलेल्या वैभवशाली सेवेसाठी विशेष अभिवादन करण्यात आले. हा पुरस्कार म्हणजे आमचा मोठा सन्मान असून, याबाबत आम्हाला आंनद होत असल्याचे जेएनपीटीचे चेअरमन संजय सेठी यांनी म्हटले आहे.

द इंडिया मेरीटाईम अवॉर्ड या क्षेत्रातील प्रतिष्ठित पुरस्कारांपैकी एक असून त्याचे आयोजन डेली शिपिंग टाईम्स या अग्रगण्य आणि सर्वात जुन्या शिपिंग वृत्तपत्राने केले होते. मेरीटाईम आणि लॉजिस्टिक्स क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कंपन्या आणि व्यक्तींना हा पुरस्कार मानाचा मुजरा करतो आणि या पुरस्कारामुळे बाजारपेठ व व्यवसायासाठी प्रतिष्ठा-सन्मान मिळत असल्याचेही सेठी यांनी शेवटी नमूद केले.

Check Also

वाढवण बंदर बाधित मच्छीमारांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार मंत्रालयात बैठक आमदार महेश बालदी यांची प्रधान सचिव लोकेश चंद्रा …

Leave a Reply