पनवेल : बातमीदार
राज्य शासनाचे कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पनवेल व रायगड व औद्योगिक प्रशिक्षण संस्था उरण (आयटीआय) आणि ऑलकार्गो कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या गुरुवारी (दि. 30) उरण येथे बेरोजगार उमेदवारांसाठी रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी 10 वाजता ऑल कार्गो कौशल्य विकास केंद्र, बोकडवीरा, सेक्टर 30, द्रोणागिरी नोड, के पॉइंट एचसमोर होणार आहे. या मेळाव्यात विविध कंपन्यांचे प्रतिनिधी त्यांच्याकडील रिक्त पदांसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यासाठी हजर राहणार आहेत. या कंपन्यांना इयत्ता दहावी, बारावी, आयटीआय, पदवी, पदवीधर अशा उमेदवारांची आवश्यकता आहे. या मेळाव्यात सहभाग घेऊ इच्छिणार्या उमेदवारांनी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाच्या http://mahaswayam.gov.in या वेबपोर्टलला भेट देऊन नोंदणी व अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे, तसेच महारोजगार वेबपोर्टलवर नोंदणी केली असल्यास त्यावर जुना 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगिन करावे आणि मोबाइल व आधार क्रमांक पडताळणी करावी. त्याचप्रमाणे जॉब फेअर टॅबवर क्लिक करून रोजगार मेळावा पनवेल यामध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे अर्ज करावा. मुलाखतीस येताना स्वत:चा बायोडाटा, दोन छायाचित्रे, सर्व शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे व त्याच्या छायांकित प्रतीसह उपस्थित राहण्याचे आवाहन पनवेल कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकार्यांनी केले आहे.