Breaking News

पांडवकडा धबधबा फेसाळला; पर्यटकांची गर्दी

पनवेल ः बातमीदार

जूनच्या सुरुवातीला पावसाने हजेरी लावली खरी, परंतु आनंदसरींची प्रतीक्षा कायम होती. अखेर शेवटच्या आठवड्यात

जोरदार सरी कोसळू लागल्या आणि अवघा निसर्ग बहरून आला. याच निसर्गाचा भरभरून आनंद घेण्यासाठी पर्यटकांची पावलेही अशा पर्यटनस्थळी वळू लागली आहेत. शनिवार-रविवारी पनवेल परिसरातील धबधबे, धरणांवर पर्यटकांनी गर्दी केली.

पनवेल तालुक्यातील पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेला पांडवकडा धबधबा दोन दिवसांपासून वाहू लागला आहे. त्यामुळे या परिसरात जाण्यासाठी वनविभागाकडून बंदी घालण्यात आली असली, तरी पर्यटक मोठ्या संख्येने येथे आले होते. शनिवार आणि रविवारी पांडवकडा धबधब्यावर सकाळी 11 वाजल्यापासूनच पर्यटकांचा ओघ सुरू झाला. वनविभाग, पोलिसांचा कोणताही बंदोबस्त नसल्यामुळे पर्यटकांचे चांगलेच फावले. याशिवाय पनवेल महापालिकेचे धरण असलेल्या गाढेश्वर धरणाच्या पात्रातदेखील पर्यटकांनी गर्दी केली होती. धरण आणि परिसरातून वाहणार्‍या गाढी नदीचा निसर्गरम्य परिसर हिरवाईने नटलेला असून पर्यटक हे पाहण्यासाठी माळडुंगे परिसरात आले होते. आदिवासीबहुल भाग असलेल्या या परिसरात अनेक वेळा रस्त्यांवर फारशी वर्दळ नसते, मात्र शनिवारपासून या परिसरातील फार्महाऊस, रस्त्यावर पर्यटक येऊ लागले आहेत. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या या परिसरात जाऊन गाढी नदीच्या पात्रात पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडत असतात, मात्र पावसाच्या सुरुवातीला पोलीस नसल्याची संधी साधत पर्यटकांनी येथे आपला मोर्चा वळविला. दुपारनंतर जागे झालेल्या पनवेल तालुका पोलिसांनी पर्यटकांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. पनवेल तालुका पोलीस ठाण्याकडून सुटीच्या दिवसात येथे येणार्‍या पर्यटकांवर निर्बंध घातले जातात.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply