मुंबई : प्रतिनिधी – मुंबईसह राज्यात मुसळधार पाऊस पडतोय. विकेण्डपासून सुरू असलेल्या या पावसाने रविवारी दुपारनंतर काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू केली.सोमवारी सकाळपासूनच रस्ते, रेल्वे वाहतुकीवर याचा परिणाम दिसून आला. रेल्वे रूळांवर पाणी साचायला लागल्यामुळे गाड्या रांगायला लागल्या. मुंबईत सायन-माटुंगादरम्यान रेल्वे रूळांवर पाणी साचल्यामुळे गाड्यांची वाहतूक मंदावली, तर ऐन गर्दीच्या वेळी पश्चिम रेल्वेची वाहतूकही ठप्प झाली. मरिन लाईन्सजवळ ओव्हरहेड वायर तुटल्याने अर्धा तास वाहतूक थांबवण्यात आली होती. सायन, माटुंगा, दादर, किंग्स सर्कल, भोईवाडा, शिवडी, धारावी अशा अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यामुळे पाणी साचले होते.
अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली. रेल्वे रूळांवर पाणी साचायला लागल्यामुळे गाड्या रांगायला लागल्या होत्या. मध्य रेल्वे 25 ते 30 मिनिटं उशिरा सुरू होती. ठाण्यापासून मुंबईकडे जाणार्या गाड्या रखडल्या. एका मागोमाग एक गाड्या ट्रॅकवर उभ्या राहिल्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. या पावसानंतर शीव परिसरातील रस्त्यावर पाणी साचलं होतं. त्यामुळे रस्त्याला जणू तळ्याचं स्वरूप आलं. दरम्यान, रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्यामुळे रस्त्यालगत असलेल्या वसाहती आणि दुकानांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे इथल्या नागरिकांची चांगलीच तारंबळ उडाली.
मुंबईच्या दादर, भोईवाडा भागामध्ये जोरदार पावसामुळे पाणी साचले. जोरदार पावसामुळे दृष्यमान कमी झाले. त्यामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. मुंबईत सध्या काळ्या ढगांनी दाटी केलीय. पुढील 12 तासांत मुंबईत जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवलाय. खरं तर गुरुवारी आणि शुक्रवारी पडलेल्या मुसळधार पावसाने काल मुंबईत उघडीप घेतली होती. त्यामुळे पावसाच्या त्रासापासून मुंबईकर वाचले होते, मात्र आता पुन्हा पावसाची संततधार सुरू झाल्याने सखल भागात पुन्हा पाणी साचलं आहे.