Breaking News

खालापूर-खोपोलीतील डेंग्यू रुग्ण सामान्य

एकत्रितपणे उपचारासाठी वावोशी येथे यंत्रणा उभारली

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी  – खालापूर तालुक्यातील छत्तीशी ग्रामीण भागात असणार्‍या दहा गाव करंबेली येथे ‘डेंग्यू’ची लागण असलेले रुग्ण मोठ्या संख्येने आढळून आल्याने तालुका व जिल्हा आरोग्य यंत्रणा सक्रिय झाली. त्याचप्रमाणे खोपोली शहरातही काही रुग्ण निष्पन्न झाल्याने नगरपालिका आरोग्य विभागाकडून सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या. सोमवारी (दि. 1) यातील सर्व 28रुग्ण सामान्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. तरीही खबरदारी म्हणून या सर्व डेंग्यू लागण असलेल्या रुग्णांना एकत्रित उपचार होण्यासाठी वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात विशेष कक्ष व उपचार सुविधा निर्माण करून सर्व रुग्णांना तेथे हलविण्यात आले आहे.

खालापूर तालुक्यातील छत्तीशी विभागातील करंबेली व दहा गावांत डेंग्यूची लागण असल्याचे 28 रुग्ण आढळून आल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. यातील तीन रुग्ण अलिबाग जिल्हा रुग्णालयात, तर अन्य रुग्ण खोपोली नगरपालिका व इतर खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी सर्व 28रुग्ण सामान्य असल्याचे स्पष्ट झाले, परंतु कोणताही धोका निर्माण होऊ नये व रुग्ण पूर्णपणे सामान्य होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने वावोशी (ता. खालापूर) प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वांसाठी एकाच ठिकाणी उपचार व्यवस्था निर्माण केली आहे. सोमवारी सर्व रुग्णांना वावोशी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले.

दरम्यान, सोमवारी जिल्हा आरोग्य सभापती नरेश पाटील, खोपोलीच्या नगराध्यक्षा सुमन औसरमल, उपनगराध्यक्ष राजू गायकवाड, नगर परिषदेच्या आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे, पंचायत समिती सदस्य उत्तम परबलकर, शिवसेना नेते नवीन घाटवळ, खोपोलीचे मुख्याधिकारी गणेश शेटे, खालापूरचे गटविकास अधिकारी संजय भोये यांनी खोपोली नगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात जाऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस करून उपचाराची माहिती घेतली. त्यानंतर विशेष उपचार सुविधा उभारलेल्या वावोशी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्व रुग्णांना पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी नवीन घाटवळ यांनी आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या सर्व रुग्णांना आर्थिक मदत देण्याचे जाहीर करून मोठा आधार दिला. जिल्हा परिषदेच्या माध्यमातूनही अशी आर्थिक मदत करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे आरोग्य सभापती नरेश पाटील यांनी माहिती दिली.

सदर रुग्णांचा रक्त तपासणी अहवाल मुंबईतील जे. जे. हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला असून, त्यांचा अहवाल दोन-तीन दिवसांत प्राप्त होईल. त्यानंतरच या रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट होईल व त्यानुसार उपचार करण्यात येतील.

-डॉ. रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी, खालापूर

उपचार सुरू असलेले रुग्ण

अनिकेत सीताराम महाडिक (23), संकेत सीताराम महाडिक (25), रोहिणी पांडुरंग गायकर (24)  यांना उपचारासाठी अलिबाग जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे, तर सुवर्णा गोविंद महाडिक (50), लता हनुमंत महाडिक (51), मनीषा प्रमोद महाडिक (35), अश्विनी अशोक गायकर (40), सुवर्णा अजित महाडिक (38), सारिका भरत महाडिक (39), वैष्णवी प्रमोद महाडिक (15), शेखर राम महाडिक (43), अभय अशोक गायकर (18), ज्ञानेश्वर सुरेश महाडिक (26), राहुल विश्वनाथ महाडिक (27), यशोदा यशवंत गायकर (65), चंपाबाई गोपाळ गायकर (56), विजया विजय महाडिक (45), आदर्श अजित महाडिक (8) आणि लक्ष्मीबाई चौगुले (45) या रुग्णांवर वावोशी प्राथमिक आरोग्य केंद्रात  उपचार सुरू आहेत.

Check Also

‘सीकेटी‘त इतिहास विभागाद्वारे आंतरराष्ट्रीय परिषद

विविध महाविद्यालये, विद्यापीठांतून 92 प्राध्यापक आणि संशोधकांची उपस्थिती पनवेल : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण …

Leave a Reply