Breaking News

हजारो फुटांच्या उंचीवर आयटीबीपीची आव्हानात्मक मोहीम

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्सकडून हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये 21 हजार फुटांच्या उंचीवर एक मोहिम हाती घेण्यात आली होती. काही गिर्यारोहकांच्या बचावासाठी ही मोहिम हाती  घेण्यात आली होती. गिर्यारोहकांच्या या गटात एकूण 12 जणांचा सहभाग होता. ज्यामध्ये 11 परदेशी तर, एका भारतीय नागरिकाचा समावेश होता.

11 परदेशी नागरिकांमध्ये आठ ब्रिटिश, दोन अमेरिकन आणि एका ऑस्ट्रेलियन गिर्यारोहकाचा समावेश होता. आयटीबीपीच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार 26 मे रोजी झालेल्या एका एका दुर्घटनेत 12 पैकी आठ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला होता. ज्यांचे मृतदेह त्या पर्वतरांगांमधून खाली उतरवण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती. बर्‍याच दिवसांच्या अथक परिश्रमांनंतर आयटीबीपीच्या पथकाने आठपैकी सात मृतदेह शोधून काढण्यात यश मिळवलं. किंबहुना त्यातील चार विदेशी नागरिकांचे मृतदेह त्यांनी मंसूरी कॅम्पपर्यंत पोहोचवले. उर्वरित तीन मृतदेह हे जवानांचं पथक नंदा देवी मार्गाने खाली आणत आहेत. गुरुवारपर्यंत हे मृतदेह पिथौरागड येथील बेसकॅम्पवर आणण्यात येतील, अशी माहिती आयटीबीपीच्या अधिकार्‍यांनी दिली. 12 मे  रोजी 12 गिर्यारोहकांचा हा गट त्यांच्या निर्धारित सूचीप्रमाणे मार्गस्थ झाला, पण 25 मे रोजी नंदादेवी बेसकॅम्पला पोहोचल्यानंतर त्यांचा संपर्क तुटला. या बेस कॅम्पला पोहोचल्यानंतर गिर्यारोहक दोन गटांमध्ये विभागले गेले. ज्यामध्ये चार सदस्यांचा एक गट नंदा देवी मार्गाने वाट शोधण्यास निघाला, तर दुसर्‍या गटाने हिमालयातीच एका व्हर्जिन सुळक्यावर चढाई करण्याचा निर्णय घेतला. व्हर्जिन सुळक्यावर चढाईसाठी गेलेला गट 21 हजार फुटांच्या उंचीवर पोहोचल्यानंतर एका दुर्घटनेचा शिकार झाला. ज्यामध्ये गिर्यारोहक पडत पडत जवळपास एक हजार फूट खाली पोहोचले. तेव्हापासूनच त्यांची कोणतीही माहिती मिळू शकली नव्हती. 26 मे रोजी ज्या दिवशी दोन्ही गटांमध्ये कोणताही संपर्क झाला नाही, तेव्हा पहिल्या गटाने दुसर्‍या गटाची शोधाशोध सुरू केली. पुढील दोन दिवस त्यांच्याविषयी कोणतीही माहिती न मिळाल्यामुळे अखेर पहिल्या गटातील एका व्यक्तीला बेस कॅम्पला यासंदर्भातील माहिती देण्यासाठी पाठवण्यात आले. 30 मे रोजी बेस कॅम्पला याविषयीच माहिती मिळाली. ज्यानंतर लगेचच त्या गिर्यारोहकांची शोधमोहीम हाती घेण्यात आली. ज्याअंतर्गत सर्वप्रथम हॅलिकॉप्टरच्या सहाय्याने चार विदेशी गिर्यारोहकांना बेस कॅम्पवर आणण्यात आले.

अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार दुसर्‍या दिवशी पाच गिर्यारोहकांचे मृतदेह शोधण्यात पथकाला यश आलं, पण तो भाग अधिक उंचीवर असल्यामुळे त्या ठिकाणी हॅलिकॉप्टर उतरवणं अशक्य होतं. ज्यानंतर वायुदलाकडून आयटीबीपीकडे याची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यांनी हे मृतदेह 15 हजार फुटांच्या उंचीवर आणले जेणेकरून ते एअरलिफ्ट करता येणं शक्य होईल.

ही जबाबदारी मिळताच हिमालयावर चढाई करण्यासाठी आयटीबीबीचं पथक तयार झालं. 15 जूनला त्यांनी ही मोहीम हाती घेतली, पण मुळातच या मृतदेहांना इतक्या उंचीवरून एअरलिफ्ट करता येणं अशक्य असल्यामुळे त्यांच्यापुढे अडचणच उभी राहिली. शिवाय त्याकरिता आयटीबीपीच्या जवानांना 18,900 फुटांची चढाई करत त्यानंतर खालीही उतरायचे होते. आपल्यासमोर असणार्‍या या आव्हानाचा स्वीकार करत अखेर स्ट्रेचरच्या सहाय्याने त्यांनी हे मृतदेह खाली उतरवले. जगातील आतापर्यंतच्या सर्वाधिक आव्हानात्मक अशा बचाव मोहिमेला हाती घेत त्यांनी ही मोहीम यशस्वीपणे पूर्ण केली.

Check Also

रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव

आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …

Leave a Reply