खालापूर, खोपोली : प्रतिनिधी
बीड खुर्द येथील आग लागलेल्या घरातून बेपत्ता असलेल्या मायलेकांचे मृतदेह शुक्रवारी (दि. 5) गावातील विहिरीत आढळून आले. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
खालापूर तालुक्यातील बीड खुर्द येथील भानुदास कर्णूक यांचे घर बुधवारी रात्री लागलेल्या आगीत भस्मसात झाले. घटना घडली तेव्हा भानुदास कामावर होते, तर घरात असलेली त्यांची मुलगी स्नेहा हिने उडी मारून आपला जीव वाचवला, मात्र पत्नी रंजना कर्णूक आणि मुलगा सनील कर्णूक बेपत्ता होते.
खोपोली पोलीस, अपघातग्रस्तांची टीम आणि बीड खुर्द ग्रामस्थ या दोघांचा तपास करीत होते. शुक्रवारी सकाळी 9 च्या सुमारास रंजना यांचा मृतदेह गावातील ग्रामस्थांना तलावाशेजारील विहिरीत आढळला, तर सनीलचा मृतदेहही सायंकाळी याच विहिरीत आढळून आला.
खोपोली पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी खालापूरला पाठवून दिले असून, याप्रकरणी अधिक तपास केला
जात आहे.
– नांदगाव खाडीत
बुडून तरुणाचा मृत्यू
मुरूड : प्रतिनिधी
नांदगाव सरणे बंदर येथील एक आदिवासी तरुण दिनेश चंदर तपीसर याचा नांदगावच्या खाडीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मुरूड पोलिसांनी अकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. खूप मद्यप्राशन केलेला दिनेश हा पत्नी संगीतासह नांदगाव खाडीच्या पाण्यातून वाट काढीत घरी परतत होता. त्या वेळी अचानक वाढलेल्या पाण्याच्या प्रवाहात तो वाहून गेला, तर पत्नी संगीता बचावली. तिने मुरूड पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दिनेशचा शोध घेतला असता, त्याचा मृतदेह नांदगावच्या समुद्र किनारी शुक्रवारी (दि. 5) पहाटे आढळून आला. याप्रकरणी अधिक तपास सुरू आहे.