लंडन : वृत्तसंस्था
विश्वचषक स्पर्धेत संघांच्या सुरक्षिततेबद्दल शंका निर्माण होईल अशी दुसरी घटना घडली आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यादरम्यान मैदानाबाहेर जस्टिस फारॅ काश्मिर (काश्मीरला न्याय द्या) आणि ’इंडिया स्टॉप जेनोसाइड, फ्री काश्मीर’ (भारताने वंशहत्या थांबवावी, काश्मीरला मुक्त करावे’)असा संदेश लिहिलेली विमाने घिरट्या घालताना दिसली.
भारत-श्रीलंका सामन्यादरम्यान हेडिंग्ले स्टेडियमवरून भारतविरोधी घोषणेचे फलक फडकावणारे विमान फिरत होते. सामना सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच हे विमान स्टेडियमवर दिसू लागले. या विमानाला जस्टिस फॉर काश्मीर असा फलक लावलेला होता. त्यानंतर काही वेळाने फिरणार्या दुसर्या एका विमानावर इंडिया स्टॉप जेनोसाइड, फ्री काश्मीर असा फलक लावलेला होता.
काही दिवसांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामन्यातही, मैदानाबाहेर जस्टिस फॉर बलुचिस्तान असा संदेश पोस्टरवर लिहीलेलं विमान घिरट्या घालत होते. यावरून दोन्ही देशांच्या समर्थकांमध्ये चांगलाच वादही झाला होता.
अशाप्रकारची घटना पुन्हा घडल्याने आम्ही खूप उद्विग्न झालो आहोत. वर्ल्ड कपमध्ये कोणत्याही प्रकारच्या राजकीय संदेशाला आम्ही थारा देणार नाही, असे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) पत्रकाद्वारे सांगितले आहे.
या संपूर्ण स्पर्धेदरम्यान आम्ही कोणत्याही प्रकारची आंदोलने होऊ नयेत, यासाठी स्थानिक पोलिसांसमवेत काम करीत आहोत. मागील घटनेनंतर अशाप्रकारचे प्रसंग पुन्हा ओढावणार नाहीत, असे आश्वासन पश्चिम यॉर्कशायर पोलिसांनी आम्हाला दिले होते, मात्र तरीही ही घटना घडल्यामुळे आम्ही असमाधानी आहोत, असे आयसीसीने म्हटले आहे.
इंग्लंडच्या उत्तरेकडे असलेल्या यॉर्कशायरमध्ये पाकिस्तानी वंशाचे नागरिक मोठ्या प्रमाणावर असून, ब्रॅडफर्ड हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो.