अ संघांमधील सामन्यात अहमद, अय्यर चमकले
केपटाऊन : वृत्तसंस्था
श्रेयस अय्यर आणि खलिल अहमद यांच्या आश्वासक खेळीच्या जोरावर भारत अ संघाने पहिल्या अनौपचारिक एकदिवसीय सामन्यात विजय मिळवला. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अकीम जॉर्डन आणि रोस्टन चेसच्या भेदक मार्यासमोर भारत अ संघाचा डाव 190 धावांत आटोपला, परंतु खलिल अहमद आणि इतर गोलंदाजांनी केलेल्या भेदक मार्याच्या जोरावर भारताने सामन्यात 65 धावांनी विजय मिळवला.
ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल हे भारताचे सलामीवीर फारशी चांगली कामगिरी करू शकले नाहीत. कर्णधार मनीष पांडेही अवघ्या 4 धावा काढून माघारी परतला. यानंतर श्रेयस अय्यरने मधल्या फळीतल्या फलंदाजांना हाताशी धरून अर्धशतकी खेळी केली. अय्यरने 77 धावा केल्या. त्याच्या खेळीमुळे भारताने 190 धावांपर्यंत मजल मारली. विंडीज अ संघाकडून रोस्टन चेसने चार, तर अकीम जॉर्डनने तीन बळी घेतले. शेफर्ड आणि कॉर्नवॉल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. भारताचा एक फलंदाज धावबाद झाला.
प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडिज अ संघाची सुरुवातही खराब झाली. विंडीजचा निम्मा संघ 95 धावांवर माघारी परतला. खलिल अहमदने विंडीजच्या आघाडीच्या फळीला खिंडार पाडले. मधल्या फळीत कार्टर आणि पॉवेल यांनी प्रत्येकी 41 धावांची खेळी करीत डावाला आकार दिला, मात्र भारतीय गोलंदाजांनी विंडीजच्या फलंदाजांचे प्रयत्न हाणून पाडले. भारताकडून खलिल अहमदने तीन, तर राहुल चहर, अक्षर पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी
प्रत्येकी दोन बळी घेतले. दीपक चहरने एका फलंदाजाला माघारी धाडले.