Breaking News

घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी ओएनजीसीकडून साडेपंधरा लाखांचा निधी

ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना यश; ग्रामस्थांमध्ये समाधान

उरण ः प्रतिनिधी

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओएनजीसी अधिकार्‍यांनी सीएसआर फंडातून 15 लाख 45 हजार 803 रुपये निधीचा धनादेश ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला आहे. जागतिक किर्तीच्या घारापुरी बेटावरील अद्भुत प्राचीन कोरीव लेण्यांमुळे बेटाला जागतिक वारसा लाभला आहे. शिवकालीन लेणी पाहण्यासाठी जगभरातून दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक बेटावर हजेरी लावतात. जागतिक प्रसिध्दीच्या झोतात असलेल्या घारापुरी बेटाला चारही बाजूने समुद्राने वेढले आहे. बेटासभोवार समुद्र असल्याने समुद्रातून मोठ्या प्रमाणात कचरा वाहून येतो. विविध प्रकारच्या येणार्‍या कचर्‍यामुळे बेटावरील किनारे अगदी भरुन जात आहेत. बेटाच्या आणि लेणी परिसराच्या स्वच्छतेसाठी कचरा गाडी, कचरा कुंड्यासाठी निधी देण्यात यावा, अशी मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने उरण पंचायत समितीच्या माध्यमातून ओएनजीसी प्रकल्पाचे मुख्य प्रबंधक नरेंद्र नसीजा याच्यांकडे सादर केला होता. घारापुरी ग्रामपंचायतीने सातत्याने केलला पत्रव्यव्यवहार, भेटीगाठी, चर्चा आणि पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ओएनजीसीने घारापुरी ग्रामपंचायतीच्या मागणी प्रस्तावाला मान्यता देत सीएसआर फंडातून 15 लाख 45 हजार 803 रुपये निधी मंजूर केला. घारापुरी बेटाच्या स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत ओएनजीसीने मंजूर रकमेचा धनादेश बेटावर आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमातून घारापुरी ग्रामपंचायतीकडे सुपूर्द केला. यावेळी ओएनजीसीचे अधिकारी देसाई, पुरातन विभागाचे कैलास शिंदे, घारापुरी ग्रामपंचयात सरपंच बळीराम ठाकूर, उपसरपंच सचिन म्हात्रे, सदस्य मंगेश आवटे, भरत पाटील, सदस्या ज्योती कोळी, मीना भोईर, शुभद्रा शेवेकर, शुभांगी मायने, तंटामुक्ती कमिटीचे अध्यक्ष सोमेश्वर भोईर, व्यावसायिक अनंत घरत, विजय पांचाळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते. याआधीही घारापुरी ग्रामपंचायतीने मागील दीड वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्या यश येऊन बेटाच्या सभोवार सरंक्षक भिंत उभारणीच्या कामासाठी जेएनपीटीने 28. 34 कोटी रुपयांचा निधी देण्याला मंजुरी दिली आहे. या कामाच्या निविदाही 23 मे 2019 रोजी प्रसिध्द झाल्या आहेत.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply