Breaking News

66वी महिला राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा ; हिमाचल प्रदेश, भारतीय रेल्वे, हरियाणा, बिहार उपांत्य फेरीत

पाटणा : वृत्तसंस्था

हिमाचल प्रदेश, भारतीय रेल्वे, हरियाणा आणि यजमान बिहार यांनी 66व्या राष्ट्रीय महिला कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. गतविजेते हिमाचल विरुद्ध हरियाणा, तर भारतीय रेल्वे विरुद्ध बिहार यांच्यात उपांत्य लढती होतील. कबड्डीच्या इतिहासात बिहारने प्रथमच उपांत्य फेरी गाठली.

पाटणा येथील पाटलीपुत्र क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व सामन्यात हिमाचलने पंजाबचा 34-17 असा पाडाव करीत उपांत्य फेरीत धडक दिली. पूर्वार्धातच लोण देत हिमाचलने 21-06 अशी मोठी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात मात्र त्यांनी सावध पवित्रा घेतला.त्याचा फायदा घेत पंजाबने 11 गुणांची कमाई करीत चांगली लढत दिली.

दुसर्‍या सामन्यात हरियाणाने राजस्थानला 44-18 असे सहज नमवित उपांत्य फेरी गाठली. पहिल्या डावतच लोण देत 21-13 अशी आघाडी घेणार्‍या हरियाणाने दुसर्‍या डावात आणखी दोन लोण देत हा विजय सोपा केला. भारतीय रेल्वेने दिल्लीचा 30-18 असा पराभव करीत आपली विजयी घोडदौड सुरूच ठेवली.

शेवटचा सामना अत्यंत चुरशीचा झाला. त्यात बिहारने प. बंगाल युनिटचा 5-5 चढायांच्या जादा डावात 26-25 (6-5) असा विजय मिळवित कबड्डीच्या इतिहासाच्या पानावर आपले नाव कोरले. बिहारने मध्यांतरातील 08-11 अशा 3 गुणांच्या पिछाडीवरून पूर्ण डावात 20-20 अशी बरोबरी साधली. त्यानंतर झालेल्या 5-5 चढायांच्या डावात बिहारने 6-5 अशी बाजी मारत उपांत्य फेरीत धडक दिली. बिहारच्या एका खेळाडूने आपल्या चौथ्या चढाईत बोनस गुणासह एक गडी टिपत संघाचा विजय सुकर केला.

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply