Breaking News

मुंबईचा बंगळुरूवर रोमहर्षक विजय

बंगळुरू : वृत्तसंस्था

मुंबई इंडियन्सने रोमहर्षक सामन्यात बंगळुरु रॉयल चॅलेंजर्सवर सहा धावांनी मात केली. आयपीएलच्या बाराव्या हंगामातील मुंबईचा हा पहिला विजय; तर बंगळुररूचा सलग दुसरा पराभव ठरला. एबी डिव्हीलियर्सने फटकेबाजी करीत मुंबईच्या गोटात चिंतेचं वातावरण निर्माण केले होते, मात्र जसप्रीत बुमराहने 19व्या षटकात भेदक मारा करीत बंगळुरुचे आव्हान आणखी खडतर केलं. यानंतर अखेरच्या षटकात विजयासाठी आवश्यक असलेल्या 18 धावा पूर्ण करत बंगळुरुला जमले नाही.

लसिथ मलिंगाच्या अखेरच्या षटकात मुंबईच्या शिवम दुबेने षटकार खेचत रंगत निर्माण केली होती, मात्र मलिंगाने आपला संपूर्ण अनुभव पणाला लावत मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एबी डिव्हीलियर्सने 70 धावांची खेळी केली, पण आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला. या खेळीदरम्यान डिव्हीलियर्सने आयपीएलमध्ये चार हजार धावांचा टप्पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो तिसरा परदेशी खेळाडू ठरला आहे. बंगळुरुकडून कर्णधार विराट कोहलीनेही चांगली फलंदाजी केली. मुंबईकडून बुमराहने तीन बळी घेतले.

त्याआधी, युजवेंद्र चहलने मोक्याच्या क्षणी केलेला भेदक मारा आणि त्याला अन्य गोलंदाजांनी दिलेली साथ या जोरावर, बंगळुरुने घरच्या मैदानावर खेळत असताना मुंबई इंडियन्सला 187 धावांवर रोखले. पहिल्यांदा फलंदाजी करण्याची संधी मिळालेल्या मुंबईने डावाची सुरुवात चांगली केली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी-कॉक यांनी डावाची आक्रमक सुरुवात केली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 52 धावांची भागीदारी केली. युजवेंद्र चहलने डी-कॉकचा त्रिफळा उडवत बंगळुरुला पहिला धक्का दिला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि युवराज सिंग यांनी फटकेबाजी करीत रोहितला चांगली साथ दिली. युवीने चहलच्या गोलंदाजीवर सलग तीन षटकार लगावले, मात्र चौथा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो झेलबाद झाला.

मोक्याच्या क्षणी बंगळुरुच्या गोलंदाजांनी विकेट काढत मुंबईला बॅकफूटवर ढकलले. त्यातच मुंबईच्या मधल्या फळीतल्या फलंदाजांनी पुरती निराशा केली. किएरॉन पोलार्ड, हार्दिक पांड्या, मिचेल मॅक्लेनघन हे फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. बंगळुरुकडून युजवेंद्र चहलने मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. त्याने चार बळी घेतले. त्याला उमेश यादव आणि मोहम्मद सिराजने चांगली साथ दिली.

-मलिंगाचा ‘नो-बॉल’ पचला बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर बंगळुरु या संघांमध्ये झालेला अटीतटीचा सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला. शेवटच्या चेंडूवर सात धावांची गरज असताना बंगळुरुला केवळ एकच धाव घेता आली. सामना संपल्यानंतर मुंबईच्या मलिंगाने टाकलेला सामन्यातील शेवटचा चेंडू नो बॉल असल्याचे लक्षात आले, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता.

Check Also

तापमानवाढीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचारादरम्यान काळजी घ्यावी -खासदार श्रीरंग बारणे

कर्जत : प्रतिनिधी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, मनसे, आरपीआय, रासप व मित्रपक्ष महायुतीचे …

Leave a Reply