Tuesday , March 28 2023
Breaking News

कशेडीतील भुयारी मार्गाची चंद्रकांतदादांकडून पाहणी

पोलादपूर : प्रतिनिधी

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चौपदरीकरणादरम्यान पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात नियोजित भुयारी मार्गाचे काम सुरू झाले असून, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत  पाटील यांनी रविवारी (दि. 14) येथे येऊन त्याची पाहणी केली. यासोबतच त्यांनी महामार्गावरून मोटारीने प्रवास करून ठिकठिकाणी चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा घेतला.

शनिवारी आंबेनळी घाटातून पोलादपूरमार्गे चिपळूण असा दौरा केल्यानंतर परतीच्या प्रवासात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66चे चौपदरीकरण सुरू झाल्यानंतर कशेडी घाटात रस्त्याचे चौपदरीकरण शक्य नसल्याने भुयारी मार्ग खणून रस्ता करण्याच्या कामाचे अवलोकन केले. या वेळी चंद्रकांतदादांसोबत स्थानिक आमदार संजय कदम, रिलायन्सचे अभियंते, प्रशासकीय अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते, तसेच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

कशेडी घाटातील 3.44 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्याचे काम रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करीत असून, याकामी 441 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या पुनर्वसन आणि सुधारणांसाठी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने गेल्याच वर्षी अभियांत्रिकी प्रॉक्युआरमेंट आणि कन्स्ट्रक्शन यांच्यासोबत 441 कोटी रुपयांचा करार केला आहे. कशेडी घाटात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तीन पदरी दोन भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. यातील करारानुसार 7.2 किमी लांबीचा आधुनिक दर्जाचा पक्का रस्ताही प्रस्तावित असून, याचे कामही रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी करणार आहे.

सह्याद्री पर्वतराजींचा कातळ फोडून कोकण रेल्वेचा करबुडे लोहमार्ग ज्याप्रमाणे बोगद्यातून नेण्यात आला, त्याप्रमाणेच खेड आणि पोलादपूरदरम्यान दोन भुयारी मार्ग निर्माण करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय महामार्ग विकास कार्यक्रमांतर्गत एनएडीपी मंत्रालयाच्या अंतर्गत आयोगाने हा प्रकल्प 30 महिन्यांत पूर्ण करण्याचे सूचित केले आहे.

Check Also

महात्मा फुले महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मंडळाच्या अध्यक्षपदी परेश ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल येथील महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य …

Leave a Reply