पनवेल ः तथागत बुद्धानंतर चक्रवर्ती सम्राट अशोक व बोधीसत्व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या धम्माला पुनर्जीवित केले. ‘असे प्रतिपादन बौद्ध धम्माचे अभ्यासक व सुप्रसिद्ध धम्मप्रवचनकार कल्पेश कांबळे गुरुजी यांनी केले. ते बुद्धगया प्रतिष्ठान अंतर्गत आम्रपाली बुद्धविहार व भारतीय बौद्ध महासभा, विभाग क्र. 14 यांच्या वतीने आम्रपाली बुद्धविहार, सेक्टर 9, बिनेदार कॉर्नर, नवीन पनवेल येथे आषाढी पौर्णिमेनिमित्ताने आयोजित केलेल्या ‘वर्षावास प्रारंभ’ कार्यक्रमात बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष बुद्धगया प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष नगरसेवक प्रकाश बिनेदार होते. या कार्यक्रमास शेकडो उपासक-उपासिका उपस्थित होत्या.
भामट्यांकडून वृद्धेची फसवणूक
पनवेल ः एका वृद्धेची दोघा भामट्यांनी फसवणूक करून तिच्याकडील दागिने व रोकड लंपास केल्याची घटना कळंबोलीत घडली. याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. कळंबोली सेक्टर 4 येथे फरसाण व चणे विक्रीचा व्यवसाय करणार्या मालती चव्हाण यांच्या दुकानात दोन अज्ञात व्यक्ती खरेदीसाठी आल्या. या वेळी त्यांनी 300 रुपयांचे विविध खाद्यपदार्थ खरेदी केल्यानंतर तिला 500 रुपये दिले. त्यातील 200 रुपये तिने परत केले. त्यादरम्यान हातचलाखी करून दोन अज्ञात इसमांनी चौहान यांचे पाकीट घेऊन त्यातील 10 हजार रुपये काढून घेतले, तसेच सोन्याचे दागिने ठेवलेली डबीही चोरून नेली. याप्रकरणी कळंबोली पोलीस अधिक तपास करीत आहेत.
बसमधून लाखोंचे दागिने चोरीला
पनवेल : कर्नाटक येथून खाजगी बसने कळंबोली येथे येणार्या एका नवविवाहितेची तब्बल दोन लाख रुपये किमतीच्या दागिन्यांची बॅग अज्ञात चोरट्याने प्रवासादरम्यान चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कामोठे पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. शारदा चेतन कुमार (28) महिनाभरापूर्वीच पतीसह कळंबोली येथे राहण्यास आली आहे. शनिवारी सायंकाळी शारदा कर्नाटकातील शिमोगा येथून ईस्टवेस्ट ट्रव्हल्स या खाजगी बसने मुंबईत येण्यासाठी निघाली होती. या वेळी शारदाला तिच्या वडिलांनी लग्नामध्ये दिलेले दोन लाख रुपये किमतीचे सहा तोळे वजनाचे दागिने तिने एका बॅगेत ठेवून ही बॅग तिने बसच्या सामान ठेवण्याच्या कप्प्यात ठेवली होती. सायंकाळी साडेसहा वाजता कर्नाटकवरून ही बस सुटल्यानंतर अन्य प्रवासी त्या बसमध्ये चढले. त्यातीलच एका चोराने संधी साधून बसमधील सर्व प्रवासी झोपेत असताना शारदाने ठेवलेली दागिन्यांची बॅग चोरली.
जातपडताळणीची प्रकरणे आठ दिवसांत निकाली काढा
पनवेल : विद्यार्थ्यांच्या जातपडताळणीची प्रलंबित प्रकरणे येत्या आठवडाभरात निकाली काढा, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्री डॉ. सुरेश खाडे यांनी बुधवारी कोकण भवन येथे सामाजिक न्याय विभागाच्या मुंबई विभाग आढावा बैठकीत दिले. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव दिनेश डिंगळे, बार्टीचे महासंचालक कैलास कणसे, अतिरिक्त आयुक्त खंडाते, सहआयुक्त माधव वैद्य, प्रादेशिक उपायुक्त बाळासाहेब सोळंकी यांच्यासह विविध महामंडळाचे अधिकारी, मुंबई विभागातील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त व जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद आदी उपस्थित होते.
एंजेल प्ले स्कूलमध्ये दिंडी
बेलापूर ः दीक्षिता अॅण्ड दिता एज्युकेशन सोसायटी लिटिल एंजेल प्ले स्कूल बेलापूर नवी मुंबईमध्ये दिनांक 12 जुलै 2019 रोजी आषाढी एकादशीनिमित्त वारकरी संप्रदाय या अंतर्गत लहान मुलांना दिंडी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेच्या प्राचार्या रोहिणी प्रदीप मुकादम यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व सांगितले. या दिंडीस संस्थेचे अध्यक्ष प्रदीप रमेश मुकादम, स्कूल टीचर फरहीन, रमेश गणा मुकादम मुलांसोबत उपस्थित राहून शाळेपासून सेक्टर 20 मधील 50 मीटर अंतरापर्यंत मुलांना दिंडी यात्रेमध्ये समाविष्ट करून घेऊन त्यांना वारकरी संप्रदायाबद्दल माहिती करून दिली.
नवीन पनवेलमध्ये घरफोडी
पनवेल ः नवीन पनवेल येथे अज्ञात चोरट्यांनी केलेल्या घरफोडीत रोख रकमेसह मोठ्या प्रमाणात इतर ऐवज लंपास केल्याची घटना गुरुवारी घडली आहे. नवीन पनवेल येथील सेक्टर 19, आर्किड सोसायटी येथे असलेल्या किड्स वर्ल्ड या कपड्याच्या दुकानासह शिवशक्ती सुपर मार्केट, प्रभा केमिस्ट या दुकानाचे अज्ञात चोरट्यांनी मुख्य शटर उचकटून आत प्रवेश केला व दुकानातील रोख रकमेसह कपडे व इतर ऐवज चोरून नेला आहे. याबाबतची तक्रार खांदेश्वर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.