Saturday , December 3 2022

पनवेल शहरातील वीजप्रश्नांचा आढावा

महापालिकेतील बैठकीत सकारात्मक चर्चा

पनवेल ः रामप्रहर वृत्त

पनवेल शहरातील महावितरण विभागाशी संबंधित असलेल्या समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी शुक्रवारी (दि. 19) महापालिकेच्या दालनात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. शहरातील विजेसंदर्भातील समस्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन या वेळी ‘महावितरण’च्या अधिकार्‍यांनी दिले.

या बैठकीला महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर विक्रांत पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती मनोहर म्हात्रे, प्रभाग समिती ‘ड’चे अध्यक्ष तेजस कांडपिळे, नगरसेवक प्रकाश बिनेदार, नगरसेविका दर्शना भोईर, मुग्धा लोंढे, भाजपचे कार्यकर्ते अमर उपाध्याय, यतीन देशमुख, पनवेल महावितरण विभागाचे कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त कार्यकारी अभियंता जयदीप नानोटे, महापालिकेचे विद्युत विभागाचे निरीक्षक श्री. कदम, शहर अभियंता संजय कटेकर आदी उपस्थित होते.

शहरातील अनेक समस्यांवर कालबद्ध कार्यक्रम आखून तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन या वेळी कार्यकारी अभियंता माणिक राठोड, अतिरिक्त अभियंता श्री. नानोटे यांनी पालिकेला दिले.

इंदिरा नगर, आंबेडकर नगर, लक्ष्मी नगर व इतर झोपडपट्टी वसाहतीत लोंबकळणार्‍या विद्युत तारा व्यवस्थित कराव्या, रिलायन्स फिश मार्केट, ठाणा नाका, टपाल नाका, साईनगर येथील रस्त्याच्या वाहतुकीस अडथळा असलेले पाच विद्युत खांब आणि जामा मशिद येथील वाहतुकीस अडथळा निर्माण करणारा खांब स्थलांतरीत करावा, पावसाळ्यात वीजपुरवठा अखंडित ठेवणे, खराब मीटर बदलावे, महापालिका हद्दीतील जीर्ण व धोकादायक खांब बदलावे, छत्रपती शिवाजी पुतळ्याशेजारील परिसरातील विद्युतवाहिन्या भूमिगत कराव्यात, विद्युत वाहिन्यांना स्पर्श होणार्‍या झाडांच्या फांद्या तोडताना पालिकेला पूर्वकल्पना द्यावी. पिसार्वे, करवले व तुर्भे गावातील जीर्ण झालेले विद्युत खांब व तारा बदलाव्या, या सर्व तक्रारींबद्दल या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली असून हे सारे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन महावितरणच्या अभियंत्यांनी आढावा बैठकीत दिले.

Check Also

राजिपकडून जनतेला मिळणार महत्त्वपूर्ण ऑनलाइन सुविधा

अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्हा परिषद (राजिप) प्रशासनाच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना घरबसल्या कशा सुविधा …

Leave a Reply