Breaking News

चिरनेर परिसरात आंबा मोहर करपला

चिरनेर : प्रतिनिधी

भातशेतीत दरवर्षी तोटा होत असल्याने चिरनेर विभागातील शेतकर्‍यांनी हापूस आंब्यांची बागायत शेती मोठ्या प्रमाणात सुरू केली आहे. यंदा आम्रवृक्ष मोहरून गेले होेते. त्यामुळे आंब्याचे चांगले उत्पादन होईल या आनंदात शेतकरी असतानाच बदलत्या हवामानामुळे या बागायतीवर बुरशीजन्य रोगांचा प्रादूर्भाव होऊन आंब्याचा मोहर करपून गेला आहे. परिणामी बळीराजा हवालदिल झाला आहे. कोकणातील भातशेती सध्या तोट्याचा व्यवसाय झाला आहे. उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत असल्याने शेतकर्‍यांनी पारंपरिक भातशेतीऐवजी आंबा बागायत शेती करण्यावर भर दिला आहे. त्यानुसार चिरनेर विभागातील शेतकर्‍यांनी भातशेतीत आंब्याची झाडे लावून बागायती निर्माण केल्या आहेत. ही आंब्याची कलमे या वर्षी ऐन भरात येऊन त्यांना जोमदार मोहर आला होता, मात्र वातावरणात अचानक मोठ्या प्रमाणात गारवा आल्याने हवेत आर्द्रता येऊन दवाचे प्रमाणही वाढले. पर्यायाने हवेतील दमटपणाने तुडतुडे या किटकांनी आंबा मोहोरावर हल्ला करून त्याचा रस शोषून घेतला. त्याचबरोबर तुडतुड्याची विष्ठा मोहोरावर पडल्याने त्यावर बुरशी मोठ्या प्रमाणात वाढली. त्यामुळे मोहराची फळधारणा पूर्णता थांबली. परिणामी शेतकरी चिंतातूर झाले आहेत. काही बागायतदारांनी आंब्याच्या कलमांवर कीटकनाशके मारूनही त्यांच्या बागांची अवस्था इतर शेतकर्‍यांसारखी झाली आहे. त्यामुळे या अस्मानी संकटाचा सामना कसा करायचा या विवंचनेत चिरनेर विभागातील शेतकरी सापडला आहे.

आंबा बागायतीवर वातावरणातील बदलाचा परिणाम होऊन आंबा मोहर करपला असला, तरी उरण तालुक्यात असणार्‍या रासायनिक कंपन्यांतील प्रदूषणाचा विपरीत परिणाम आंब्याच्या फळधारणेवर झाला आहे. प्रदूषित हवामानामुळे शेतकरी संकटाच्या गर्तेत सापडला आहे.

-अविनाश म्हात्रे, आंबा बागायत शेतकरी

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply