एटीएम सेवाही बंद; व्यावसायिकांमध्ये प्रचंड संताप
कर्जत : बातमीदार – माथेरानमध्ये युनियन बँकेचे एकुलते एक एटीएम आहे. मात्र ते नेहमी बंद असते. त्यामुळे स्थानिकांसह येथे येणारे पर्यटक त्रस्त आहेत. माथेरानमधील व्यापारी व नागरिकांनी युनियन बँकेच्या शाखाधिकार्यांना घेराव घालून बँकेच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली.
देश डिजिटल होत आहेत. केवळ प्रशासकीयच नव्हे तर रोजचे व्यवहार ही ऑनलाईन होत आहेत. मात्र जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या माथेरानमधील एटीएम सेवेचे तिनतेरा वाजल्याचे दिसत आहे. सध्याच्या स्थितीत इथे एकमेव असलेल्या युनियन बँकेचे एकुलते एक एटीएम सेंटर, कधी नेटवर्क अभावी तर कधी मशीन खराब असल्यामुळे बंद असते. बँकेची ‘बॅक मित्र‘ ही चांगली संकल्पनादेखील पर्यटक व नागरिकांना दैनदिन व्यव्हारासाठी तुटपुंजी ठरत आहे. त्यात काही ठिकाणी स्वाईप मशिनही चालत नसल्याने पर्यटक, व्यापारी व नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यांनी बुधवारी (दि. 28) बँकेच्या कारभाराबद्दल नाराजी दर्शवत शाखाधिकारी बनसोडे यांना घेराव घालत त्यांना धारेवर धरले. यावेळी शाब्दिक चकमक उडाल्याने एकच गोंधळ उडाला. माथेरानचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत काळे यांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन हस्तक्षेप केल्याने काही वेळासाठी तापलेले वातावरण शांत झाले. या वेळी माजी नगरसेवक प्रदिप घावरे, कुलदिप जाधव अरविंद शेलार, व्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष राजेश चौधरी, संतोष कदम, चंद्रकांत जाधव, मनोज जांभळे व अन्य नागरिक उपस्थित होते.
सोमवार (दि. 2) पर्यंत बँकेच्या सर्व सेवा सुरळीत करू, असे आश्वासन देत शाखाधिकारी बनसोडे यांनी यावेळी दिलगिरी व्यक्त केली. तर शाखाधिकार्यांनी दिलेल्या वेळेत बँकेतील व्यवहार सुरळीत न केल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा संतप्त नागरिकांनी दिला.