पनवेल : बातमीदार
रंग-रेषा व छटा या अविष्कारांची मुक्त उधळण पनवेलकरांनी नुकतीच अनुभवली. संस्कार भारती पनवेल समितीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त चित्रगुरूंचा सत्कार आणि त्यांची प्रात्यक्षिके अशा वेगळ्याच कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पनवेल परिसरातील ज्येष्ठ चित्रकार नंदकुमार गोगटे, रामदास झोपे, राजेंद्र कांबळे, सुलभा जोशी, अनिल वाघमारे व श्री. बेहरे यांचा सत्कार संस्कार भारती रायगड विभाग विधा समन्वयक सुनीता खरे आणि पनवेल समिती अध्यक्षा वैजयंती बुवा यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी वेगवेगळ्या चित्र प्रकारातील चित्रप्रदर्शन भरविण्यात आले होते, सुलभा जोशी यांनी त्यांच्या अँबस्टॅक्ट, तसेच चाकॉल पेंटिंग या चित्र प्रकारांबाबत माहिती दिली. राजेंद्र कांबळे यांनी मिनी वॉटर कलरमधून रेखाटलेले व्यक्तिचित्र या वेळी विशेष आकर्षण ठरले. चित्रकार अनिल वाघमारे यांनी वारली चित्रकलेची प्रात्यक्षिके दाखवताना आदिवासी संस्कृती वारली चित्रकलेमध्ये वापरली जाणारी प्रतीके आणि वारली चित्रकलेला दिलेली आधुनिकतेची जोड याबद्दल उपस्थितांना माहिती दिली.
पनवेलमधील जुन्या वाड्यांचा अभ्यास करून हे वाडे नव्या स्वरूपात कसे पाहता येतील याबद्दल आर्किटेक्ट सुरभी गाला यांनी माहिती दिली, तर चित्रकलेकरिता एकमग्नता आवश्यक असते आणि ही एकाग्रता योगामुळे साध्य होते असे, मत रामदास झोपे यांनी या वेळी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्रकला विभागप्रमुख मिलिंद गांगल यांनी केले, तर संस्कार भारतीचे प्रथम महामंत्री व चित्रकार पद्मश्री डॉ. वि. श्री. वाकणकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांचे संशोधन व कलाक्षेत्रातील कार्याची माहिती रायगड विभाग विधा समन्वयक सुनीता खरे यांनी सांगितली. नीलूताई आपटे यांनी आभार मानले. उपाध्यक्ष अमित चव्हाण, सचिव सुलक्षणा टिळक, अपर्णा नाडगौंडी, मधुरा देसाई, मच्छिंद्र पाटील, श्रेया कुलकर्णी आदी या वेळी उपस्थित होते.
- सर्वच अभ्यास विषयाचे मूळ चित्रकलेमध्ये आहे. ते साध्य करण्यासाठी लहानपणापासूनच चित्रकलेत रस घ्यायला हवा. यातून संवेदनशील मन निर्माण होईल.
- -नंदकुमार गोगटे, चित्रकार