Breaking News

अपहृत चार मुला-मुलींचा शोध

पनवेल : बातमीदर

नवी मुंबई पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने नवी मुंबईच्या विविध भागांतून अपहरण झालेल्या तीन अल्पवयीन मुलींचा व एका अल्पवयीन मुलाचा एकाच दिवसात शोध घेण्याची कामगिरी केली, तसेच यातील अल्पवयीन मुलींना पळवून नेणार्‍या तिघांना ताब्यात घेऊन नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील अपहरणाचे चार गुन्हे उघडकीस आणले.

नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी नवी मुंबईच्या हद्दीतून अपहृत मुला-मुलींचा तातडीने शोध घेण्याच्या सूचना दिल्याने अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने दोन-तीन महिन्यांमध्ये अपहरण झालेल्या गुन्ह्यांचा तपास सुरू केला होता. या तपासादरम्यान, उरण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला नागेश शिवप्पा जाधव याने पळवून नेल्याचे तसेच या मुलीला त्याने कर्नाटकमधील बिदर जिल्ह्यात हुमनाबादमधील हंदिकेरा गावात ठेवल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी गेल्या शुक्रवारी हंदिकेरा गावातून अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला पळवून नेणार्‍या नागेश जाधव याला ताब्यात घेतले. त्याचप्रमाणे एनआरआय पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला गुरप्रीतसिंग त्रिलोकचंद रेखी याने पळवून नेऊन लातूर येथील उदगीर परिसरात ठेवल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी त्या ठिकाणावरून अल्पवयीन मुलीची सुटका करून गुरप्रीतसिंग रेखी याला ताब्यात घेतले, तसेच कोपरखैरणेमधून अपहरण झालेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला अमोल बनसोडे या आरोपीने पळवून नेऊन तिला सोलापूर येथील दादरफळ वाडी येथे ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सोलापूरमधून या मुलीची सुटका करून अमोल बनसोडेला ताब्यात घेतले आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अपहरण झालेला 17 वर्षीय मुलाचादेखील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडून शोध सुरू असताना तो रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी चिपळूणमधून त्याला ताब्यात घेऊन त्याच्या पालकांच्या स्वाधीन केले. दरम्यान, या प्रकरणातील अपहृत मुलींना पळवून नेणार्‍या आरोपींना पुढील कारवाईसाठी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आल्याची महिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन गरड यांनी दिली.

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply