Breaking News

बेपत्ता रिक्षाचालकाचा मृतदेह सापडला

पनवेल : बातमीदार

नेरूळ सेक्टर 18 मधील तलावात रविवारी दुपारी बुडालेल्या नामदेव सखाराम देवघरे या रिक्षाचालकाचा मृतदेह अखेर सोमवारी सकाळी तलावात सापडला. रविवारी दुपारी देवघरे हे तलावात पोहण्यासाठी उतरले असताना, ते बुडाले होते. देवघरे यांना चांगले पोहता येत होते. त्यामुळे तलावात पोहण्यासाठी उतरल्यानंतर ते तलावातील गाळात रुतले असावेत. त्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

नामदेव देवघरे हे पनवेल तालुक्यातील विहिघर गावात राहण्यास होते. नामदेव देवघरे हे पनवेलमध्ये राहण्यास असले, तरी ते वाशी आणि नेरूळ परिसरात रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित होते. देवघरे हे रिक्षा चालवण्यासाठी घरातून बाहेर पडल्यानंतर दोन ते तीन दिवसांनंतर घरी परतत होते. शनिवारी दुपारी 12 वाजता ते घरातून रिक्षा घेऊन नवी मुंबईत आले होते. शनिवारी दिवसा व रात्रभर रिक्षा चालविल्यानंतर रविवारी दुपारी देवघरे हे नेरूळ सेक्टर 18मधील तलावाजवळ रिक्षा थांबवून येथील तलावात पोहण्यासाठी उतरले. या वेळी पोहताना ते अचानक बुडाल्याची माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिली.

त्यामुळे नेरूळ पोलिसांनी रविवारी सायंकाळी अग्निशमन दलाच्या मदतीने तलावात बराच शोध घेऊनही देवघरे यांचा मृतदेह हाती लागला नव्हता. अखेर नेरूळ पोलिसांनी रात्री शोधमोहीम थांबवून नामदेव देवघरे बेपत्ता झाल्याची नोंद केली होती, मात्र सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास देवघरे यांचा मृतदेह तलावात तरंगताना आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. नेरूळ पोलिसांनी याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नामदेव देवघरे नेरूळमधील तलावात बुडाल्याची बातमी नेरूळमध्ये पसरल्यानंतर देवघरे यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरातील रिक्षाचालकांमध्ये होती, मात्र देवघरे हे कुठल्याच मानसिक तणावाखाली नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. देवघरे यांना चांगले पोहता येत होते. त्यामुळे ते आत्महत्या करूच शकत नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply