
रेवदंडा ः प्रतिनिधी
रेवदंडा पोलीस कर्मचारी वसाहत दुरवस्थेत असून अवघ्या 32 वर्षांत इमारत पडीक झाल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जाते. रेवदंडा पोलीस ठाणेनजीकच सन 1987 साली पोलीस कर्मचारी वसाहतीचा शुभारंभ झाला. या पोलीस कर्मचारी वसाहतीमध्ये काही वर्षांत रेवदंडा पोलीस ठाणे कर्मचारीवर्गाने राहण्यासाठी उपभोग घेतला, परंतु कालांतराने या इमारतीच्या स्लॅबमधून पाणी झिरपू लागले, तसेच इमारतीला ठिकठिकाणी तडे गेले. परिणामी येथे राहणे पोलीस कर्मचार्यांसाठी धोकादायक बनले. येथे चाळीसपेक्षा जास्त कर्मचारीवर्ग उपलब्ध आहेत, परंतु या सर्वांना राहण्यासाठी रेवदंडा परिसरात भरमसाठ भाडे भरून भाडोत्री जागा घ्याव्या लागतात. सध्या ही इमारत अगदीच मोडकळीस आली असून इमारतीला भरपूर ठिकाणी तडे गेल्याचे दिसून येतात. इतकेच नव्हे तर इमारतीचे दारे-खिडक्या मोडून तोडून इतरत्र पडल्या आहेत, तसेच इमारतीच्या भिंतीवर चक्क वृक्षवेली उगवलेल्या दिसून येतात.