अलिबाग : प्रतिनिधी
आधारकार्डच्या नाव आणि पत्त्यात बदल करून जमिनीचे व्यवहार करणार्या टोळीतील सात जणांना रायगड पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली. यात एका महिलेचा समावेश आहे. आरोपींकडून बनावट आधारकार्ड बनविणारी यंत्रसामुग्री आणि 10 लाख 50 हजारांची रक्कम हस्तगत करण्यात आली आहे.
रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी गुरुवारी (दि. 25) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जे. ए. शेख सोबत होते.
रोहा तालुक्यातील सुशील गणेश भरतू यांची चांडगाव येथे आणि ओमप्रकाश सुखीराम वसिष्ठ यांची शेडसई येथे प्रत्येकी साडेसहा एकर जागा आहे. सुशील भरतू यांचे 2010मध्ये निधन झाले आहे; तर ओमप्रकाश वसिष्ठ दिल्ली येथे राहतात. गेली अनेक वर्षे ते रोह्यात आले नाहीत. त्यांच्या जमिनी परस्पर विकण्याचा कट आरोपींनी रचला. त्यासाठी भरतू व वसिष्ठ यांची माहिती घेऊन त्यांच्या जमिनीचे सातबारा व इतर महसुली उतारे काढून घेण्यात आले.
दोघांच्या नावाने बोगस व्यक्ती तयार केल्या, तसेच महा ई-सेवा केंद्रात जाऊन मूळ मालकाचा आधार नंबर व बायोमेट्रिक आयडेंटिटी न बदलता त्यावरील नावे, राहण्याचा पत्ता व इतर माहितीमध्ये शासनाने पुरविलेल्या सोयीप्रमाणे बदल केला. त्याचप्रमाणे मूळ मालकांची आधारकार्ड व पॅनकार्ड ही कागदपत्रे बोगस व्यक्तींच्या नावाने तयार करून खरेदीदाराबरोबर व्यवहार केला. शेवटी आरोपींनी मूळ मालकाच्या नावाने युनायटेड बँक ऑफ इंडिया वर्सोवा (मुंबई) शाखा व आयडीबीआय बँक रामनगर (डोंबिवली) शाखेत बनावट खाती खोलून त्याद्वारे 28 लाखांची रक्कम काढून घेतली.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर जमिनीचा व्यवहार करणार्यांनी याबाबत पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार स्थानिक गुन्हे विभागाने तपास करून घनश्याम रमेश उपाध्याय (रा. मानपाडा, डोंबिवली) आणि संदीप जगन लोंगले (रा. पाली, ता. कर्जत) या दोन आरोपींसह दलाल व शासनाच्या महा ई-सेवा केंद्रातील दोन आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून संगणक, लॅपटॉप, कलर प्रिंटर, तसेच बनावट आधारकार्ड बनविणारी यंत्रसामुग्री, बनावट आधारकार्ड, पॅनकार्ड आणि 10 लाख 50 हजारांची रोकड जप्त केली.