कर्जत : बातमीदार
दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांंतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर शिबिरे आयोजित करण्यात येत आहेत, मात्र कर्जतमध्ये घेण्यात आलेले शिबिर तालुक्यातील अपंग बांधवांसाठी डोकेदुखीच ठरले. पंचायत समितीच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका अपंग बांधवांना बसला. त्यामुळे हे शिबिर गोंधळ शिबिर ठरले आहे.राज्याच्या अपंग कल्याण आयुक्तांनी 26 जानेवारी 2019 पासून दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियानांतर्गत दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र वितरण करण्याच्या दृष्टिकोनातून तालुका स्तरावर शिबिरे आयोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कर्जत पंचायत समिती कार्यालयात शिबिर आयोजित करण्यात आले होते.कर्जत तालुक्यात सुमारे 1500 अपंग बांधवांची नोंद आहे. शिबिरासाठी सकाळी सुमारे 200च्या वर अपंग बांधवांनी हजेरी लावली होती, मात्र नियोजनाची जबाबदारी असलेल्या पं. स. कार्यालयाकडून शिबिरार्थींच्या पदरी साफ निराशा पडली. पं. स. कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराला रॅम्प नसल्याने अपंग बांधवांना चढायला-उतरायला त्रास झाला. या कार्यालयाच्या दुसर्या मजल्यावर शिबिरासाठी काही टेबल ठेवल्याने तेथे जाताना अपंग बांधवांची अक्षरशः फरफट झाली. सर्वांना नाश्ता दुपारी एकच्या नंतर देण्यात आला. फोटोची जागेवर सोय नसल्याने लाभार्थींसोबत आलेल्या व्यक्तीचीदेखील धावपळ उडाली. या गोंधळामुळे अनेक अपंग बांधव माघारी गेले.शिबिराचे नियोजन 200 लोकांच्या दृष्टीने केले होेते, मात्र लाभार्थींसोबत घरातली मंडळीदेखील आली. ज्यांना जिना चढता येऊ शकतो, त्यांची सोय दुसर्या मजल्यावर केली होती व ज्यांना जिना चढता येत नाही, त्यांची तळमजल्यावर सोय केली होती, पण ऐनवेळी गडबड झाली. पं. स. च्या मागच्या बाजूस आम्ही रॅम्प केलेला आहे. पुढेही रॅम्प व्हायला हवा त्यासाठी प्रयत्न करू. -छतरसिंग एस. राजपूत, सहाय्यक गटविकास अधिकारी, कर्जत.